देश बळकटीसाठी युवकांचा सहभाग आवश्यक!

0

वर्षानुवर्षे भारतीय औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बरीच उत्तम कामगिरी करीत आहेत. हिरे, मोती, माणके यांच्यासमोर फिके पडतील असे शूर, वीर नागरिक आपल्या भारतात आहेत. आपण आताच्या व्यस्त जगात वावरणारे व्यस्त लोक! आपल्या हातातील कचरा कुठल्याही कचरापेटीत टाकायला आपल्याला फुरसत नसते म्हणून आपण भररस्त्यात कचरा टाकत जातो. मग प्राथमिक शाळेतील मुले स्वच्छ भारत अभियानाचा नारा देऊन तो कचरा काढत असतात.

आपण आजचे युवक आपल्याला जर कुणी विचारलं की आपल्या भारताचे पंतप्रधान कोण? तर आपल्याला माहीत नसतं. मात्र, त्याऐवजी आपल्याला विचारलं तर नवीन अक्षयकुमारचा चित्रपट कोणता? तर त्याविषयी आपल्याला माहीत असतं. कोणत्याही 11 वी 12 वीच्या वर्गात डोकावून बघितलं तर पुढचे दोन-चार बाक सोडून बाकीचा अख्खा वर्ग आपल्याच जगात रमलेला असतो. शिकले-सवरलेले आपण आजचे युवक वाईट मार्गाकडे खेचत चाललेलो आहोत. असं म्हटलं जातं की विहिरीत ढकलायला कुणीही कुठूनही तयार असतो. मात्र, एकदा जर माणूस त्या विहिरीत पडला तर त्याला बाहेर काढणारा मात्र कुणीच नसतो! याचा अर्थ असा की वाईट मार्गावर पोहोचवणारे अनेक असतात. मात्र, त्या मार्गावरून खेचून आणून चांगला मार्ग दाखवणारे फारच कमी असतात. असंही म्हटलं जातं की आग लागल्यावर विहीर खोदू नये त्याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे आपण जे काय करतो, जे काय बोलतो त्याचं आपल्याला भान असायला हवं.
भारताला खरं तर या अशाच लोकांची खूप गरज आहे, जे भारताला नवं नाव देतील किंवा भारताची नवी ओळख जगाला करून देतील! पण दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे असे युवक आपल्याला क्वचितच, कुठेतरी भेटतात ज्यांना आपल्या देशातील लोकांच्या परिस्थितीची जाणीव आहे!
जसे एका नाण्याला दोन बाजू असतात, तसेच या भूतलावर दोन वेगवेगळ्या तर्‍हेची, वेगवेगळ्या विचारांची, वेगवेगळ्या आचारांची माणसे वावरत असतात. एका बाजूला असे लोक – ज्यांना आपल्या देशात भरीव कामगिरी करण्याचं, देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं स्वप्न ते उराशी बाळगतात. ते स्वप्न पूर्ण करण्याची कळकळ त्यांच्यात असते व ते इतरांसाठीही जगतात. दुसर्‍या बाजूला अशा प्रकारचे लोक – ज्यांना भारताविषयी, या आपल्या लोकांविषयी काहीच पडलेलं नसतं. ते फक्त आपल्याच कामात, सुखी आयुष्य जगण्यात, मौज-मजा करण्यात व्यस्त असतात.

एकदा एक कुटुंब सहलीला एका उद्यानात जातं आणि सतत काहीतरी खाऊन भलामोठा कचर्‍याचा ढीगच तयार करतात. जेव्हा घरी परतण्याची वेळ होते तेव्हा नवरा बायकोला विचारतो, काही राहिलं नाही ना मागं? तितक्यात त्यांचा मुलगा हातात कचर्‍याचा ढीग घेऊन येतो आणि त्या ढिगाआडूनच म्हणतो, हे राहिलं आहे मागे, याचं काय करायचं? त्या लहानशा मुलाला जसं समजलं की आपण केलेल्या कचर्‍याचा आपणच बंदोबस्त केला पाहिजे, तसंच जेव्हा सगळ्यांना कळेल, तेव्हाच आपला भारत स्वच्छ आणि आदर्श भारत बनणार.
बोलणं, सल्ला देणं सोपं असतं. पण तेच विचार आपल्या आचरणात आणणं फार कठीण असतं. पण जर आपण बोलतो तसंच वागलो.., चांगले गुण आचरणात आणले.., भलाईच्या मार्गावर चाललो तर आपलंच नाही तर अख्ख्या भारताचं भवितव्य उज्ज्वल करू शकतो! नाही कां? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत मोहिमेला उत्साहाने प्रतिसाद देण्याची गरज आहे. मात्र, काहींना याचे काहीच पडले नाही. काळानुसार बदलायला हवे. मोदी म्हणताहेत हायटेक व्हा, डिजिटल व्हा, तंत्रसाक्षर व्हा…
मात्र, आजची युवा पिढी हे कितपत गांभीर्याने घेते? ही एक गंभीर समस्याच आहे. देश बळकटीसाठी तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा आहे… तरच सकारात्मक बाबी घडतील. देश झपाट्याने प्रगती साधेल…

किरण चौधरी

9823312005