देशी बनावटीच्या पिस्तूलसह एकास अटक

0

65 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
शिरपूर:बेकायदेशीररित्या देशी बनावटीची पिस्तूल बाळगणार्‍या नाशिक जिल्ह्यातील एका युवकास पल्सर मोटार सायकल वाहनासह पिस्तूल व जिवंत काडतुसासह अटक करण्याची कामगिरी शिरपूर शहर पोलिसांनी मंगळवारी, 23 जून रोजी केली आहे. या कारवाईत 65 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
केला आहे.
सविस्तर असे, तालुक्यातील हाडाखेडकडून धुळ्याकडे एक इसम पल्सर मोटार सायकल (क्र.एम.एच. 15-एफऐ-2680) ने आग्रा-मुंबई हायवे रोडने जात असून त्याच्याकडे एक पिस्तूल बाळगुन असल्याची गोपनिय माहिती शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती. त्यावरून 23 जून रोजी पहाटेच्यावेळी आग्रा-मुंबई महामार्गावर आढे गावाकडे जाणार्‍या रोडजवळ टोलनाक्याचे अगोदर आमोदे शिवार येथे पोलीस पथकाने सापळा रचला होता. पहाटेच्या सुमारास संशयित पल्सर मोटार सायकलवर आल्यावर तिला थांबवून चौकशी केली. चौकशीवेळी दीपक कौतिक पोळ (वय-20, रा.वाकी बुा., ता.चांदवड, जि.नाशिक) याचा संशय आल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या ताब्यातील 30 हजार रुपये किमतीची देशी बनावटीचे पिस्तूल व 100 रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुस मिळून आले. त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील 35 हजार रुपये किंमतीचे एक काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल असा 65 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे पोकाँ. महेंद्र देवराम सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन शिरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि चंद्रकांत पाटील करीत आहे.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि चंद्रकात पाटील, पोहेकाँ. रामकृष्ण मोरे, पोकाँ. महेंद्र सपकाळ, पोकाँ. हेमंत पाटील यांनी केली.

Copy