देशात विक्रमी 2700 लाख टन कडधान्याचे उत्पादन : मोदी

0

नवी दिल्ली : शेतकर्‍यांनी कडधान्याची शेती करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. या हाकेस शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या प्रतिसादामुळे देशात कडधान्याचे विक्रमी उत्पादन झाले. शेतकर्‍यांनी मेहनत घेतली आणि विक्रमी 2700 लाख टन कडधान्याचे उत्पादन केले. कडधान्यामधूनच देशातील गरीबांना प्रोटिन मिळते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केले.

डिजिटल व्यवहारांत वाढ
पंतप्रधान मोदी म्हणाले, डिजिटल व्यवहारांसाठी देशातील जनता पुढाकार घेत आहे. यामध्ये तरुण वर्गाचा मोठा सहभाग आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या ‘डिजिधन व्यापारी योजना’ आणि ‘लकी ग्राहक योजना’ यांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या योजनांमुळे डिजिटल व्यवहारांसाठी एक मोहिम सुरु झाली. या अंतर्गत आजपर्यंत 10 हजार नागरिकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. आजपर्यंत तब्बल 150 कोटींची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तसेच यामध्ये 15 वर्ष वयोगटातील तरुणापासून 65 वर्ष वयोगातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

भीम अ‍ॅपचा वापर करा
डिजिटल व्यवहारांसाठी केंद्र सरकारने लाँच केलेल भीम अ‍ॅप महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हे अ‍ॅप सव्वाशे कोटी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. येत्या 14 एप्रिलपर्यंत प्रत्येकाने किमान 125 लोकांना भीम अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली ठरेल, असे मोदी म्हणाले.

इस्त्रोच्या कामगिरीची कौतुक
वसंताचे आगमन झाल्याचे मोदींनी मन की बात मध्ये सांगत जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, वातावरण अल्हाददायक असेल तर लोकही त्याचा आनंद घेतात. नुकतेच भारताने 104 उपग्रह अवकाशात सोडले. जगभरातून याचे कौतूक होत आहे. इस्त्रोने ऐतिहासिक कामगिरी करुन भारताचे नाव उंचावले आहे.

स्वच्छता मोहिमेचा उल्लेख
स्वच्छता समाचार हा विशेष कार्यक्रम दुरदर्शनने सुरु केला आहे. स्वच्छतेच्या आड येणारे अडथळे तोडण्यात आले आहेत. आयएएस अधिकार्‍यांनीही टॉयलेट स्वच्छ केले. यामुळे सर्वसामान्यांमध्येही स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. स्वच्छतेसाठी माध्यमांनीही प्रचार करून सहकार्य केले.

मुलींबद्दल सकारात्मक विचार होतोय
बेटी बचाओ बेटी पढाओ हा आता सरकारी कार्यक्रम राहिला नसून सामाजिक उपक्रम झाला आहे. मुलींबद्दल सकारात्मक विचार होत आहेत, हे चांगले संकेत आहेत. मुली कोणत्याही बाबतीत मुलांपेक्षा कमी नाहीत, हे समाज आता स्वीकारत आहे. सुकन्या समृद्धी योजनेत अनेक पालकांनी गुंतवणूक केली आहे. अधिकार, सन्मान आणि संपत्तीतही महिलांना बरोबरीचा अधिकार आहे, असे मोदी म्हणाले. ब्लाइंड टी-20 वर्ल्डकपमध्ये यश मिळविणार्‍या भारतीय खेळाडूंचेही पंतप्रधानांनी मन की बातमध्ये अभिनंदन केले.