देशातील २४ विद्यापीठं बोगस; महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगानं देशातील २४ स्वयंभू संस्थानांना बोगस घोषित केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबद्दलची घोषणा केली आहे. या २४ बनावट विद्यापीठातील दोन विद्यापीठांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. सर्वाधिक बोगस विद्यापीठं असणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात आठ बोगस विद्यापीठं असून दिल्लीमध्ये सात आहेत. ओडिशा आणि बंगालमध्ये प्रत्येकी दोन बोगस विद्यापीठं असून कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पाँडिचेरीत प्रत्येकी एक विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील हे विद्यापीठ नागपुरात असून राजा अरेबिक युनिव्हर्सिटी असे नाव आहे.

लोकसभेत विचारलेल्या लेखी प्रश्नावर उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली. “विद्यार्थी, पालक, नागरिक तसंच प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या तक्रारींच्या आधारे युजीसीने २४ विद्यापीठांना बोगस घोषित केले आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. “याशिवाय लखनऊमधील भारतीय शिक्षा परिषद आणि नवी दिल्लीमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंटकडून युजीसीच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही संस्थांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. या विद्यापीठांवरील कारवाईसंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “युजीसीने या विद्यापीठांसंबंधी हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली आहे”. तसेच आयोगाने राज्याचे सचिव, शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांच्या अख्त्यारित असणाऱ्या अशा विद्यापीठांवर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले आहेत. यासोबत अवैध डिग्री देणाऱ्या या संस्थांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक ८ बोगस विद्यापीठ आहेत. यामध्ये वाराणसीतील वाराणसी संस्कृत विद्यापीठ, अलाहाबादमधील महिला ग्राम विद्यापीठ, कानपूरमधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमोपॅथी, अलिगढमधील नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ, मथुरेतील उत्तर प्रदेश विद्यापीठ, प्रतापगडमधील महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विद्यापीठ आणि नोएडातील इंद्रप्रस्थ शिक्षण परिषदेचा समावेश आहे. दिल्लीत ७ बोगस विद्यापीठं आहेत. यामध्ये वाणिज्यिक विद्यापीठ लिमिटेड, संयुक्त राष्ट्र विद्यापीठ, व्यावसायिक विद्यापीठ, एडीआर केंद्रित न्यायिक विद्यापीठ, भारतीय विज्ञान आणि इंजीनियरिंग संस्था, विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ आणि आध्यात्मिक विद्यापीठाचा समावेश आहे.

Copy