देशातील पहिल्या महिलांच्या रिक्षा स्टँडचे गुरूवारी निगडीत उद्घाटन

0

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचा पुढाकार..!

पिंपरी चिंचवड : देशातील महिलांचे पहिले रिक्षा स्टँडची स्थापना पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. गुरूवार दि.06 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ भक्ती-शक्ती या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे, शिवांजली मंचच्या अध्यक्ष पूजा महेशदादा लांडगे, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते या रिक्षा स्टँडचे उद्घाटन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुबोध मेडसीकर (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड शहर), श्रीमती नीलिमा जाधव (पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड), उल्हास जगताप (सहायक आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका), श्रीमती संगीता पाटील (पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा खडकी) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महिलांना मिळाल्या परमिट रिक्षा…
महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कष्टकर्‍यांचे नेते बाबा कांबळे आणि घरकाम महिला सभेच्या अध्यक्षा आशाताई कांबळे यांच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड शहरातील शंभरपेक्षा अधिक महिलांना रिक्षा लायसन्स, बॅच, परमिट आणि नवीन रिक्षा मिळाल्या आहेत. यामुळे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाने रिक्षाचालक झाल्या असून, आता महिलाही रिक्षा चालवणार आहेत. महिलांना रिक्षा चालवण्यासाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे, त्यांनाही हक्काचे रिक्षा स्टँड मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन…

महिलांना शिक्षणाचे दार उघडणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणार्‍या राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वतोपरी मदत करणार्‍या त्यागमूर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला पिंपरी चिंचवड शहरात महिलांसाठीचे रिक्षा स्टँड स्थापन होत आहे. या पहिल्या रिक्षा स्टँडच्या उद्घाटनप्रसंगी मोठ्या संख्येने नागिराकंनी उपस्थित रहावे, असे आवाहन रिक्षा स्टॅन्डच्या अध्यक्ष सरस्वती गुजलोर, यमुना काटकर, विजयालक्ष्मी हडपद, संगीत कांबळे, जयश्री मोरे, श्रीमती जयश्री साळुंखे यांनी केले आहे.

Copy