देशातील एकमेव ज्वालामुखी सक्रीय

0

पोर्टब्लेअर । देशातील एकमेव जिंवत ज्वालामुखी आता पुन्हा सक्रिय झाला आहे. अंदमान निकोबार द्वीपसमूहात पोर्टब्लेअरपासून सुमारे 140 किलोमीटर उत्तरपूर्व भागात असलेल्या या ज्वालामुखीतून परत एकदा लाव्हा उसळण्यास सुरुवात झाली आहे. याआधी 1991 मध्ये 150 वर्षांनंतर हा ज्वालामुखी सक्रिय झाला होता. आता पुन्हा एकदा वैज्ञानिकांनी या ज्वालामुखीत लाव्हा उसळताना पाहिला आहे. गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे (एनआईओ) संशोधक अतुल मुधोळकर यांनी यासंदर्भात बोलताना सदर ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाला असल्याचे सांगितले.

सक्रिय झालेल्या या ज्वालामुखीतून लाव्हा आणि राख निघायला सुरुवात झाली आहे. अतुल मुधोळकर म्हणाले की ज्वालामुखी पुन्हा सक्रीय होत असल्याचे 23 जानेवारी रोजी स्पष्ट झाले.या ज्वालामुखीतून दर 5 ते 10 मिनिटांनी उद्रेक होत असल्याचे पहायला मिळत आहे. या उद्रेकामुळे दिवसा ज्वालामुखीच्या परिसरात केवळ राखेचा झोळ पहायला मिळत आहे.

सुर्यास्तानंतर मात्र या ज्वालामुखीच्या अंर्तभागातून लाल लाव्हेचे कारंजे उडत असून आणि लाव्हा खालच्या बाजूला सरकत आहे. लाव्हेचे उसळलेले कारंजे पहायला जरी चांगले वाटत असले तरी ते खूपच धोकादायक आहे. 26 जानेवारी रोजी केलेल्या पहाणीतून ज्वालामुखीच्या अंर्तभागात सतत स्फोट होत असून त्यातून राख बाहेर येत असल्याचे आढळले.
जगातील सर्वात जास्त सक्रिय असलेले ज्वालामुखी
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वॉलकोनॉलॉजी आणि केमेस्ट्री ऑफ द अर्थ इंटिरेयर या संस्थने गेल्या दहा वर्षांमध्ये कायम सक्रीय राहिलेल्या ज्वालामुखींची यादी जाहीर केली आहे.

एजाफ्जल्लाजोकुल, आइसलँड
आइसलँडीक फॉर आइसलँड माऊंटन ग्लेशीअर नावाने ओळखला जाणारा हा ज्वालामुखी आईसलँडमधील छोट्या बर्फाळ प्रदेशात आहे. हा ज्वालामुखी 1,666 मीटर उंच आहे. 2010 मध्ये हा ज्वालामुखी जागृत झाल्यावर सुमारे 20 देशांनी पश्‍चिम आणि उत्तर युरोपला जाणारी विमान वाहतूक रद्द केली होती. त्यामुळे सुमार एक लाख पर्यटकांना त्याचा फटका बसला होता.

माउंट व्हेसुव्हियुस, इटली
हा ज्वालामुखी इटलीतील नेपल्स शहरापासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर आहे. जगातला सर्वात धोकादायक म्हणून या ज्वालामुखीची ओळख आहे. 1944 साली या ज्वालामुखीने मोठा फटका येथील नागरिकांना दिला होता. पण त्याआधी इसवीसनपूर्व 79 मध्ये जागृत झाल्यावर या ज्वालामुखीने हर्कलॅनेयुएम आणि पॉम्पेई या शहरांची राखरांगोळी केली होती.

साकुराजीमा, जपान
जपानमधील हा सक्रीय ज्वालामुखी आहे. 1914 मध्ये हा ज्वालामुखी जागृत झाल्यावर उसळलेल्या लाव्हामुळे हा द्विपसमूह ओसुमी पेनीनसुलाशी जोडला गेला. सतत सक्रीय असलेल्या या ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात राख बाहेर येत आहे. हा ज्वालामुखी जागृत झाल्यामुळे या प्रदेशात पांढर्‍या वाळूचे डोंगर उभे राहिले होते.

माउंट मेरापी, इंडोनेशिया
फायर माऊंटन म्हणून ओळखला जाणारा हा ज्वालामुखी मध्य जावा आणि इंडोनेशीयाच्या सिमारेषेवर आहे. सतत सक्रीय असलेला हा ज्वालामुखी 1548 पासून नियमीतपणे आपले अस्तीत्व दाखवून देत आहे. या ज्वालामुखीच्या बाजूच्या परिसरात हजारो लोकांचे वास्तव्य आहे.

माऊंट नियरागाँगो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉगो
डेमोक्रॅटीक रिपब्लीक ऑफ द काँगोमधील वायरुंगा नॅशनल पार्क परिसरात हा ज्वालामुखी आहे. दोन किलोमीटर एवढा विस्तार असलेल्या या ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडत असतो. त्यामुळे या ज्वालामुखीची लाव्हा लेक म्हणून ओळख आहे.

उलावून, पपुआ न्यू ग्युनेआ
न्यू ब्रिटनीट बेटावर हा ज्वालामुखी आहे. बिस्मार्क आर्किपेलागोमधील सर्वात जास्त उंचीचा (सुमारे 2,334 मीटर उंच) हा ज्वालामुखी आहे. या प्रदेशातील सर्वात जास्त सक्रीय असलेला ज्वालामुखी म्हणून याचा उल्लेख केला जातो. या ज्वालामुखीच्या जवळ हजारो लोक राहतात. 18 व्या शतकापासून 22 वेळा या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची नोंद सापडते.

ताल वॉलकानो, फिलिपाईन्स
फिलीपाईन्समधील सतत सक्रीय असलेल्या दुसर्‍या क्रमांकाचा हा ज्वालामुखी आहे. आतापर्यत 33 वेळा हा ज्वालामुखी जागृत झाला होता. या ज्वालामुखीचे आतापर्यंतचे सर्व उद्रेक ताल लेकच्या मध्यभागी झाले होते. त्यामुळे हा परिसर नेहमीच विलोभनीय दिसत आलेला आहे.

माऊना लोआ, हवाई
हवाई बेटावर असणार्‍या पाच ज्वालामुखीपैकी एक आणि पृथ्वीवरील सर्वात जास्त विस्तार असलेला हा ज्वालामुखी आहे. माउना लोआ या हवाई शब्दाचा अर्थ सर्वात लांब पर्वत असा होतो. या ज्वालामुखीतून वाहणारा लाव्हा नेहमी प्रवाहीत असतो.

गॅलेरस, कोलंबिया
हा ज्वालामुखी समुद्र सपाटीपासून 4,276 मीटर उंचीवर आहे. सतत सक्रीय असलेला हा ज्वालामुखी 7 डिसेंबर 1580 रोजी पहिल्यांदा जागृत झाल्याची नोंद आहे 1993 मध्ये हा ज्वालामुखी जागृत झाल्यावर त्यातून बाहेर आलेल्या विविध गॅसेसमुळे सहा संशोधकांसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

सॅटा मार्फा, ग्वाटेमाला
1902 साली हा ज्वालामुखी जागृत झाला होता. विसाव्या शतकातील तो चौथ्या क्रमाकांचा आणि मागील दोनशे वर्षांमधील पाचव्या क्रमांकाचा उद्रेक होता.

वैज्ञानिकाचे 24 तास लक्ष
विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्था आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने यासंदर्भात संयुक्तरीत्या एक पत्रक काढले आहे. पोर्टब्लेअरपासून 140 किलोमीटर अंतरावर असलेला ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाला आहे. बॅरेन ज्वालामुखीतून अचानकपणे राख यायला सुरुवात झाल्यावर या ज्वालामुखीच्या जवळील समुद्रीतळावर एसआयआर आणि एनआयओच्या बोटींवरील संशोधकांनी राखेचे नमुने घेतले आहेत. याशिवाय ज्वालामुखीतील लाव्हेपासून तयार झालेल्या दगडांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.