देशाच्या अखंडतेशी खेळाल तर खैर नाही : दत्ता म्हस्के

0

जामनेर : देशाच्या अखंडतेशी गद्दारी करणे खपवून घेतले जाणार नाही. देशाच्या अस्मितेशी कोणी खेळत असेल तर त्याची खैर नाही, असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभागीय संघटन मंत्री दत्ता म्हस्के यांनी दिला. शहरातील महालक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात म्हस्के बोलत होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय निबंध व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप व सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर कवी अशोक कोळी, शहराध्यक्ष गौरव खोडपे, शहरमंत्री प्रमोद सोनवणे हे होते. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येसाठी झटणारी लढाऊ संघटना असून ‘अभाविप’विद्यार्थ्यांच्या हिताच्या कामात नेहमी सहभागी राहते, असे प्रतिपादन करुन म्हस्के यांनी विस्तृत माहिती दिली. शहराध्यक्ष गौरव खोडपे यांनीही विचार मांडून विद्यार्थ्यांना डोळसपणे वागण्याचा प्रयत्न करावा, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप हाताळण्यापेक्षा वाचन वाढवावे, वृत्तपत्राचे नियमित वाचन विद्यार्थ्यांनी करणे आजच्या धकाधकीच्या काळात आवश्यक असल्याचे सांगितले. कवी अशोक कोळी यांनीही ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, स्त्री भ्रृणहत्या, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

विजयी स्पर्धक असे
प्रथम कल्पना पवार, द्वितीय किर्ती गोयर, तृतीय प्रियंका निकम, तर काव्य स्पर्धेतील विजेते प्रथम शुभम भोंगळे, द्वितीय महितपराव तायडे, तृतीय जयश्री निकम आदींचा समावेश आहे. काव्य स्पर्धेतील द्वितीय विजेते महिपतराव तायउे (वरणगाव) यांचा नुकताच मृत्यू झाला आहे. संबधीत बक्षीस त्यांच्या मुलाने स्वीकारले. विजय सुयर्वंशी यांनी सुत्रसंचालन केले तर आभार रुपेश बिर्‍हाडे यांनी मानले. हर्षिता महाजन, गणेश माळी, मयूर पाटील, ज्ञानेश्‍वर माळी, आकाश नेमाडे, शुभम माळी, कल्पेश बेलदार, रविंद्र झाल्टे, आतिष झाल्टे आदींनी सहकार्य केले.