Private Advt

देशसेवा बजावण्याचे स्वप्न अपूर्णच : पाचोर्‍यानजीक युवकाचा अपघाती मृत्यू

पाचोरा : भारतीय सैन्यात भरती होण्यासाठीची पूर्व परीक्षा देवून घरी परतत असलेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. पाचोरा तालुक्यातील नेरी ते भामरे दरम्यान महिंद्रा पिकअपने दुचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात तेजस सुरेश महेर (20, पांगरे, ता.कन्नड) असे मयताचे नाव आहे.

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अपूर्णचे
मयत हा तेजस कन्नड तालुक्यातील नागद गावाजवळील पांगरे या छोट्याशा गावातील रहिवासी होता. सैन्यात भरती होवून देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याने सैन्यात भरती होण्यासाठी जळगावच्या गुरुकुल अकॅडमीत प्रवेश घेतला होता. अकॅडमीत सैन्यभरती पूर्व परीक्षाचा शेवटचा पेपर देवून बुधवार, 6 एप्रिल रोजी तेजस हा पाचोरा तालुक्यातील लोहटार येथे मुक्कामी थांबला व गुरुवार, 7 एप्रिल रोजी सकाळी लोहटार येथून नातेवाईकांची दुचाकी घेऊन पांगरे, ता.कन्नड येथे निघाला असताना भामरे गावाजवळ मालवाहू महिंद्रा पिकअप या चारचाकी वाहने मागवून त्यास जोरदार धडक दिल्याने व डोक्याला गंभीर मार लागल्याने तेजसचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच भामरे गावातील काही नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन चारचाकी वाहन चालकास चांगलाच चोप दिला तर तेजसच्या मोबाईलवरून बहिणीला फोन केल्यानंतर मयताची ओळख पटली.

नातेवाईकांचा आक्रोश
तेजजसच्या पश्चात आई, वडिल व बहिण असा परीवार आहे. तेजस हा आई-वडिलांचा एकूलता एक मुलगा होता. नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात येवून हंबरडा फोडला.