देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना शिक्षा होईलच-मुख्यमंत्री

0

मुंबई- कथित माओवादी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला. पाचही कार्यकर्त्यांना पुन्हा ४ दिवसाची नजरकैद ठेवण्याबाबतचा निर्णय देण्यात आला. कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांची नजरकैद 4 आठवड्यांनी वाढवली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो असे सांगत त्यांनी देशविरोधी कारवाई करणाऱ्यांना शिक्षा होईलच आणि ते गजाआड जातील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.

अटकेतील कार्यकर्त्यांचे समर्थन करणे म्हणजे देशाच्या शत्रूंना साथ देण्यासारखेच आहे. कुठलाही राजकीय पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाही, दिला तर ते जनतेपुढे उघडे पडतील. आमचा विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नाही. राजकीय हेतू, सज्जन लोकांना त्रास दिला जातोय काही लोक असं वातावरण तयार करत होते म्हणूनच त्यावेळी पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषद घेणे योग्य की अयोग्य हा प्रश्न नाही, तर देशाच्या विरोधात षडयंत्र रचणा-यांना पोलिसांनी पकडले हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयानं आम्ही आणि पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य ठरवली आहे. पोलिसांनी दुर्भावनेनं हे काम केलेलं नाही हे सिद्ध झालं आहे. पुणे पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सर्व पुरावे मांडलेले होते. अनेक वर्षांपासून त्यांचं हे काम चालत असल्याचं या पुराव्यांतून समोर आलं आहे. माओवाद्यांना पाठिंबा देत असल्याचं पुराव्यांवरून स्पष्ट होतंय. पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. हे लोक अनेक वर्षांपासून देशाविरोधात षडयंत्र रचतायत.

पोलिसांनी दिलेले पुरावे नक्षलींशी संबंधित आहेत. अंतर्गत वाद निर्माण व्हावा, असा या लोकांचा प्रयत्न होता. त्याच्या या कृत्याचा पर्दाफाश झाला आहे. यांचा ताबाही आम्ही लवकरच घेऊ, देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे, देशात जातीजातींमध्ये द्वेष पसरवणा-यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हा देशाचा सर्वात मोठा विजय आहे.

Copy