देशभरात २२ हजार तबलिगींचे विलगीकरण

0

नवी दिल्ली – तबलिगी जमातचे सदस्य आणि त्यांच्या संपर्कात आलेले लोक अशा एकूण २२ हजार अनुयायांचे देशभरात विविध राज्यांमध्ये विलगीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहसंयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी शनिवारी दिली.
गेल्या दोन दिवसांमध्ये ६४७ रुग्ण तबलिगशी संबंधित आहेत. २ एप्रिल रोजी देशभरात ९ हजार तलबिगींचे विलगीकरण करण्यात आले होते. पुढील दोन दिवसांत ही संख्या १३ हजारांनी वाढली आहे.
गेल्या महिन्यात मार्चमध्ये दिल्लीतील मरकज निजामुद्दीनमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या २ हजार अनुयायांना दिल्ली पोलिसांनी बाहेर काढले होते. त्यातील साडेतीनशेहून अधिक अनुयायांमध्ये करोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मरकझला भेट दिलेल्या देशभरातील अनुयायांना केंद्राने राज्य सरकारांना युद्धपातळीवर शोधून काढण्याचा आदेश दिला होता. यानंतर देशभरात १४ करोनाचे हॉटस्पॉट निश्चित करण्यात आली आहे. दिल्लीत दिलशाद बाग, निझामुद्दीन, उत्तर प्रदेशात नोएडा, राजस्थानमध्ये भिलवाडा, केरळमध्ये कारगौड, पथनामथिट्टा आणि कन्नूर, महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि यवतमाळ, मध्य प्रदेशमध्ये इंदूर आणि जबलपूर, गुजरातमध्ये अहमदाबाद, लडाख या राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे हॉटस्पॉट आहेत. करोनाची बाधा झालेल्या तबलिगी जमातच्या अनुयायांची संख्या १७ राज्यांमध्ये १०२३ झाली आहे. त्यात तमिळनाडू, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, आसाम, कर्नाटक, अंदमान, उत्तराखंड, हरियाणा, महाराष्ट्र, हिमाचल, केरळ, अरुणाचल प्रदेश, झारखंड या राज्यांचा समावेश आहे. करोनाच्या रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण तबलिग अनुयायी आहेत.

Copy