देशभरात लोक मरताहेत तरीही गांभीर्य नाहीच

0

अमित महाबळ

सरकारचे प्रयत्न कोणासाठी सुरू आहेत हेच अनेकजण समजून घ्यायला तयार नाहीत. अंतिमतः सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना करावी लागली आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाता येणार नाही. आवश्यक असेल तरच खासगी वाहने रस्त्यावर येऊ शकतील. थोडक्यात वैद्यकीय निकड, अथवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वाहने बाहेर काढता येतील. जमावबंदी असूनही लोक रस्त्यावर कसे फिरतात अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रशासनाला केली. लोक घरात बंदिस्त होत आहेत. ही अटीतटीची वेळ कोणामुळे आली याचा विचार केव्हा करणार? या सर्वाला जनताच जबाबदार आहे.

कोरोनामुळे जगभरात लोक मरताहेत तर मरू द्या, सरकार घराबाहेर निघू नका म्हणून सांगतेय तर सांगू द्या पण आम्ही किती बेफिकीर आहोत हे संपूर्ण जगाला दाखवून देण्याची एकही संधी काही भारतीयांना सोडलेली नाही. कोरोना म्हणजे काय, त्याचा तिसरा आणि चौथा टप्पा नेमका काय आहे? याचे भानदेखील आपल्याला नाही. संपूर्ण राज्यभरात कलम 144 लागू आहे. पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र जमण्यास मनाई आहे. किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद करण्याचे सक्त आदेश असतानाही दुकाने उघडण्याची लगबग असते. खरेदीसाठी बाजारात गर्दी होते. एकमेकांशी संपर्कातूनच कोरोना पसरत असल्याचे समजून घ्यायला अनेकजण तयार नाहीत. जनता बिनधास्त आहे तर सरकार काळजीत आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण भारतात सापडल्यापासून केंद्र आणि राज्य सरकार दररोज एक-एक नवीन निर्बंध लागू करत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जनजागृतीच्या पातळीवर असलेले कोरोना प्रतिबंधाचे निर्देश आता सक्तीने अंमलबजावणीच्या टप्प्यावर येऊन ठेपलेले आहेत. आणीबाणीनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचे वातावरण संपूर्ण भारतामधील जनता एकाचवेळी अनुभवत असेल. कोरोनाचा पहिला मृत्यू गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये झाला. त्यानंतर केवळ चारच महिन्यात या विषाणूचे आक्राळविक्राळ रुप जगासमोर आले आहेत. त्यापुढे आज संपूर्ण जग हतबल झाले आहे. 186 देशातील 12 हजारांपेक्षा अधिक जणांचा बळी हा केवळ कोरोनाची लागण झाल्यामुळे गेला आहे. दुर्दैवाने हा विषाणू जडला असल्याचे समोर दिसत असून, त्यावर कोणताही औषधोपचार अथवा लस उपलब्ध नाही. 3 लाख जण पॉझिटीव्ह आलेले आहेत. भारतात 7 जणांचे बळी गेले आहेत तर 350 पेक्षा अधिकजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात कोरोनाचा दुसरा टप्पा आहे. त्यानंतरचा तिसरा व चौथा टप्पा म्हणजे गणितीय पद्धतीने या विषाणूची लागण होणे होय. दुसरा टप्पा आपण ओलांडू नये, त्याला ब्रेक मिळावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारच्या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनास संपूर्ण समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खरा मात्र, या स्वयंस्फूर्त निर्बंधाचे ‘सेलिब्रेशन’ करण्यात आल्याचे दुर्दैवी चित्रही बघायला मिळाले. याच दिवशी सायंकाळी 5 वाजता नागरिकांना कोरोनाला रोखण्यासाठी अविरत झटणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सरकारी कर्मचारी इत्यादींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची होती. त्यासाठी आपापल्या घरासमोर उभे राहून शंखनाद, थाळीनाद करायचा होता अथवा घंटा वाजवायची होती. याऐवजी काही नाठाळांनी फटाके फोडून कशाचा आनंद व्यक्त केला हे त्यांनाच माहित! जागतिक पातळीवर भारताचे हसे करण्याचा उद्योग या नादान लोकांनी केला. काहींनी ‘जनता कर्फ्यू’ची खिल्ली उडविण्यात धन्यता मानली. सरकार अंतराळात उपग्रह पाठवून औषधांचे फवारणी करणार असल्याचे चुकीचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले गेले. अशांची कोरोनाबाधितांशी भेट घडवून दिल्यावर त्यांना सरकारच्या प्रयत्नातील गांभीर्य कळून चुकेल, असे सुज्ञांनी समजून घ्यावे. बुद्धिवंतापेक्षा अर्धवट ज्ञानी जास्त धोकादायक असतात. काविळ झाल्यावर स्वतःसकट सर्वच पिवळेधम्मक दिसायला लागते. नाईलाज असतो. हा आजारच तसा आहे. जनता कर्फ्यूवेळी उत्साहाच्या भरात काहींच्या हातून फटाके फोडण्याचा, रस्त्यावर उगाच फिरण्याचा नादानपणाही घडला. त्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली. कोरोनाशी लढा देण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन जाहीर केलेला असतानाही काही लोक याला गांभीर्याने घेत नाहीत. कृपा करून तुम्ही स्वत:ला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा आणि सूचनांचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांना लोकांना करावे लागले. देशाचे पालकच आज जनतेला विनंती, आर्जव करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही आठवड्याच्या पहिल्या दिवशी फार काही वेगळे चित्र दिसले नाही. राज्याच्या नागरी भागात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार पाचपेक्षा अधिकजणांना एकत्र येण्यास मनाई आहे. सर्व प्रकारच्या रेल्वे आणि उपनगरीय सेवा (लोकल) बंद केल्या गेल्या आहेत. एसटी वाहतूक बंद आहे. एक-एक सेवा मर्यादित केली जात आहे. त्याच्याशी जनतेला काहीच देणे घेणे नसल्याचे वर्तन दिसते. सरकारचे प्रयत्न कोणासाठी सुरू आहेत हेच अनेकजण समजून घ्यायला तयार नाहीत. अंतिमतः सर्वत्र संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांना करावी लागली आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आवश्यक असेल तरच खासगी वाहने रस्त्यावर येऊ शकतील. वैद्यकीय निकड, अथवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी वाहने बाहेर काढता येतील. पुण्यामध्ये बाहेरील वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. नाशिकमध्ये दुचाकी वाहनांना 100 रुपयांचे तर चारचाकीला 1000 रुपयांचे इंधन मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे. रिक्षातून चालक व सोबत एक प्रवासी अशा दोघांनाच प्रवास करता येणार आहे. केंद्र सरकारने आंतरराज्यीय विमानसेवा बंद केली आहे. जमावबंदी असूनही लोक रस्त्यावर कसे फिरतात अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रशासनाला केली आहे. लोक घरात बंदिस्त होत आहेत. ही अटीतटीची वेळ कोणामुळे आली? याचा विचार केव्हा करणार? या सर्वाला जनताच जबाबदार आहे. जमावबंदी असताना रस्त्यावर ‘जमाव’ असतो. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. सरकार वारंवार सांगते परंतु, ऐकायचे अनेकजण मनावरच घेत नाही.