Private Advt

देशभरातील पशुपक्षांचे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन डिसेंबरमध्ये

0

जालन्यात होणार आयोजन, केंद्रीय कृषिमंत्री येणार

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे हे उपक्रम वाढीस लागले आहेत. शेतकऱ्यांना पशुधनाचा फायदा घेता यावा यासाठी जालना जिल्ह्यात राष्ट्रीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन डिसेंबर महिन्यात केले जाणार आहे. या प्रदर्शनासाठी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग उपस्थित राहणार आहेत. देशभरातील मान्यताप्राप्त विविध जातिवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, घोडे,वराह तसेच जातिवंत कुक्कुट पक्षी यांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. पशुपालकामध्ये पशुपालनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे हा यामागचा उद्देश्य असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी जवळपास १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पशुपालकात पशुपालनाची आवड निर्माण व्हावी यासह देशी/संकरित पशुधनाचे जतन व संवर्धन करणे तसेच पशुधनाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी हे प्रदर्शन घेतले जाणार आहे. जालन्यातजवळपास १५० एकर जागेवर हे प्रदर्शन होणार असून या प्रदर्शनामध्ये सेल्फ साफिसिएंट गावाचा सेटअप उभारला जाणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक गोपालन, म्हैस पालन, शेळी-मेंढी पालन, कुक्कुट पालन वराह पालन आदी गोष्टींचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात तज्ञ मार्गदर्शक शेतकरी, पशुपालकांना मार्गदर्शन करणार आहेत. देशभरातील तज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रदर्शनात इतर राज्यांचा सक्रीय सहभाग असेल. सोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील १०० पशुपालकांचा सहभाग असेल. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या उत्कृष्ट पशुधनास रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. सोबतच प्रदर्शनात पशुधन खरेदी-विक्रीची देखील सुविधा असणार आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या मौल्यवान पशुधनाचा एक किंवा तीन वर्षांचा विमा उतरवला जाणार आहे. या सर्व आयोजनासाठी अंदाजे १० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असल्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.