देशभक्तीच्या आभासी दिखाऊपणाचे दिवस

0

प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य या शब्दांचा अर्थही माहीत नसणारी पिलावळ इथे निरनिराळ्या कळवंडी खेळत राहतील. भारत माझा देश आहे… ही प्रतिज्ञा पूर्णपणे पाठसुद्धा नसलेले फॉरवर्ड पोस्ट विचारवंत पांढरी कापड अन् त्यावर ध्वज लावून झेंडा वंदन करायला जमतील. वंदन झाल्या-झाल्या गोळ्या, बिस्किटे अन् अल्पोपाहार घ्यायला जमतील तेव्हा तिथेसुद्धा समता, एकता, बंधुता नावाची त्रिसूत्री अतोनात पायदळी तुडवली जाईल. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू होतील…

प्रिय स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनास,
सादर प्रणाम, बघा आता तुमच्या दोघांच्या एका दिवसाच्या आठवणीत समस्त देशप्रेमी (अ‍ॅक्चुली दिवसप्रेमी) नागरिक इथे प्रेम दाखवायला आपापल्या परीने सज्ज झाले आहेत. या आभासी दुनियेत आता तीन रंगांच्या मधोमध अशोक चक्र असलेला चौरंगी कलर मधला सन्माननीय ध्वज प्रत्येकाच्या वाल वर झळकू लागलेत. तसेच जर सच्चे देशप्रेमी असाल तर अमकी पोस्ट लाइक करा, शेयर करा, कमेंट करा, असे खडसावणारे क्रांतिकारी तथाकथित देशभक्तही तयार आहेत. आता हळूहळू प्रोफाईल फिचर बदलत आहेत. वर्षभर इतरत्र वाहत जाणारे आमचे रक्त आता सळसळ करायला लागलंय. आमच्यात किती देशप्रेमाची आग आहे हे दाखवण्याचा हा आभासी सोहळाच एकंदरीत सुरू झालाय. अर्थात तुम्हाला वंदन करणे आवश्यक आहेच. मात्र, तुम्हाला वंदन करण्यासाठी देशभक्तीच्या व्याख्येत होत असलेल्या बदलाने व्यथित होतोय.

खरं तर आज देशभक्तीची व्याख्याच बदलली आहे. देशभक्ती म्हणजे काय? या प्रश्‍नाचे उत्तर म्हणजे आपल्या 5 इंचांच्या स्मार्टफोनवरून जीओच्या फुकट इंटरनेटचा वापर करून केवळ दोन दिवसांपुरते बदललेले प्रोफाईल फिचर असं तर नाही ना? किंवा इकडून-तिकडून आलेला भला मोठा संदेश अनेकांना टॅग करून वाहत येणार्‍या प्रवाही पोस्ट म्हणजे देशभक्ती आहे का? असो तरीही अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे असं करणार्‍यांना अजिबात विरोध करण्याची हिंमत नाहीच. देशभक्तीची व्याख्याच मुळात आम्हा लोकांना समजून आलेली नाही. आज तर सरकारी धोरणांचा विरोध करणारे लोकदेखील देशद्रोही होत आहेत. शिक्षणासाठीच्या मूलभूत सुविधा मागणारे विद्यार्थी आज देशद्रोही, मूलभूत अधिकारांसाठी रस्त्यांवर उतरणारे लोक देशद्रोही. म्हणजे आपल्या देशात देशभक्त होणे अवघड आणि देशद्रोही होणे सोपे झाले की काय? असाही सवाल यानिमित्ताने मनात येतोय. साध्या-साध्या गोष्टी आहेत. स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी सरकार अब्जावधी रुपये खर्च करत आहे.

ज्या गांधीजींच्या नावावर स्वच्छता अभियान राबवले जात असते, त्या गांधीजींची तसबीर असलेल्या प्रत्येक सरकारी कार्यालयाचे कोपरेदेखील स्वच्छ ठेवू शकत नाहीत. आम्ही रस्त्यावर उपाशी मरणार्‍या लोकांकडे, विधानभवनापासून 200 मीटर अंतरावर थंडीत कुडकुडत झोपणार्‍यांकडे, फिरायला गेले म्हणून कुत्र्यागत मार खाणार्‍या प्रेमीयुगलांकडे, बोकाळणार्‍या गुंडागर्दीकडे, वाढता भ्रष्टाचार, दिवसाढवळ्या होणार्‍या बलात्कारांच्या घटनांकडे, अमुक-ढमुक-तमुक तमाम समस्यांकडे पाहून दाखवत नसलो, तरीही राष्ट्रभक्ती अफाट आहे हे आम्ही या दोन दिवसांत दाखवून देतो. कृषक संस्कृती जोपासणार्‍या या कृषिप्रधान देशातला राजा माणूस म्हणजे शेतकरी. तो रोज मरतोय, मरत मरतच जगतोय. त्याच्यासाठी येणार्‍या योजना आणि निधी झिरपा सिद्धांतानुसार त्याच्याजवळ येतो. तोवर तो मेलेला असतो. रानात राबताना त्याला देशभक्ती किंवा देशद्रोही हे शब्दही माहीत नसतात. पण या दिवसाच्या निमित्ताने तो शेतकरी राजा ठेवणीत ठेवलेला एखादा ड्रेस घालून आणि तो नसलाच तर फाटक्या बदामीवरही तिरंग्याला सलामी द्यायला येतोच. त्याला तुझी आणि तुला त्याची अशीही आवश्यकता नाहीच की काय? असंही वाटत राहतं. हे दोन दिवस सुटी आणि राष्ट्रीय सण असल्यामुळे आम्ही मनवत असल्याचा आम्हाला नितांत गर्व नव्हे, तर अभिमानसुद्धा आहे. आता आठवडाभर तरी किमान या नवमाध्यमांवर जबरी फोटो, स्टेट्सद्वारे देशप्रेम, सैनिकांप्रति प्रेम, ध्वजप्रेम अक्षरश: उफाळून येईन.

प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्य या शब्दांचा अर्थही माहीत नसणारी पिलावळ इथे निरनिराळ्या कळवंडी खेळत राहतील. भारत माझा देश आहे… ही प्रतिज्ञा पूर्णपणे पाठसुद्धा नसलेले फॉरवर्ड पोस्ट विचारवंत पांढरी कापड अन् त्यावर ध्वज लावून झेंडा वंदन करायला जमतील. वंदन झाल्या-झाल्या गोळ्या, बिस्किटे अन् अल्पोपाहार घ्यायला जमतील तेव्हा तिथेसुद्धा समता, एकता, बंधुता नावाची त्रिसूत्री अतोनात पायदळी तुडवली जाईल. पण पुन्हा रात्रीला जाती, धर्म, वर्गाच्या नावावर ज्याची-त्याची सेटिंग लागलीच सुरू होईन. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न सुरू होतील. 27 जानेवारी आणि 16 ऑगस्टपासून आम्हाला तुमचे अजिबात देणेघेणे नसते. त्यामुळे कृपा करा तुम्ही येऊच नका. असेही वर्षभर तुमची आठवण आम्हाला येत नाहीच आणि हो आजच्या घडीचा सेल्फीचाही बराच त्रास होईल. पण तो सहन करा. चार दिवस तुमच्यासोबत फोटोंची चंगळ राहील. बाकी तुम्ही आहात महान. तुमची महानता अफाटंय. तुम्हाला लक्ष लक्ष सलाम! चुकल असेल तर माफी द्यालच…!
आपलाच, एक देशभक्त…!

– निलेश झालटे
9822721292