Private Advt

देव दर्शनातून परतताना अपघात : दोघे भाविक ठार

मयत जळगावच्या कांचन नगरातील रहिवासी : बेपर्वाईने वाहन चालवल्याने घडला अपघात

रावेर : श्रावण सोमवारनिमित्त मध्यप्रदेशातील शिरवेल येथील महादेवाचे दर्शन करून परतणार्‍या जळगावच्या कांचन नगरातील भाविकांच्या बोलेरो मॅक्स मालवाहू मेटॅडोर पाल (ता.रावेर) येथे उलटल्याने दोघे भाविक ठार झाले तर आठ जण जखमी झाले. हा अपघात सोमवार, 23 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला.

देव दर्शनाहून परतताना अपघात
जळगाव येथील कांचन नगरातील भाविक मालवाहू मेटॅडोर बोलेरो मॅक्स (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.5315) याद्वारे मध्यप्रदेशातील शिरवेल येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतताना पाल दूरक्षेत्र पोलीस ठाणे अंतर्गत वनविभागाच्या नाक्यापासून अर्धा किलोमीटर अंतराववरील वळणावर सोमवार, 23 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्यामुळे भरधाव वेगाने असलेले वाहन झाडाला धडकल्याने उलटले. या अपघातात गोलू बंडू परदेशी (26) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (36, दोघे रा.कांचननगर, जळगाव) हे दोघे जागीच ठार झाले तर अजय सुनील वाल्हे (21), गणेश रवींद्र सोनवणे (23), परेश निंबा सोनवणे (26), चेतन रवींद्र मोरे (23), पवन रवींद्र मोरे (22), महेश गोविंदा सोनवणे (21), गजानन रमेश पाटील (24) व चालक विक्की अरूण चौधरी (25) हे जखमी झाले. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र राठोड, पोलीस संदीप धनगर, नरेंद्र बाविस्कर, ठाकूर यांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जखमींना रात्रीच जळगावच्या सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवण्यात आले . याबाबत भूषण दिलीप सपकाळे (कांचननगर, जळगाव) यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंनिस शेख करीत आहेत.