दूषित पाण्यातही भुसावळ पालिका अव्वल

0

भुसावळ : देशभरात सर्वात अस्वच्छ शहर म्हणून भुसावळचे नाव आणणार्‍या सत्ताधार्‍यांच्या काळात सर्वाधिक अस्वच्छ पाणीपुरवठा करण्यात पालिका अव्वल ठरली असून सत्ताधारी व पालिका प्रशासनाने भुसावळकरांच्या आरोग्याशी खेळ चालवला असून तब्बल 44 टक्के दूषित पाणीपुरवठा शहराला होत असल्याचा दावा कृउबा सभापती सचिन संतोष चौधरी यांनी येथे केला. जामनेर रोडवरील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधून सत्ताधार्‍यांच्या कारभारावर आसूड ओढला.

शहराला 44 टक्के दूषित पाणीपुरवठा
शहराला गेल्या काही महिन्यांपासून पालिकेकडून दूषित पाणीपुरवठा केला जात असून पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे आलम हे निकृष्ट दर्जाचे असून त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे पाण्याचे नमूने पाठवण्यात आल्यानंतर प्राप्त अहवालात शहराला तब्बल 44 टक्के दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे ते म्हणाले. दूषित पाण्यमुळे साथीचे आजार बळावण्याची भीती असून या प्रकाराबाबत वेळीच दखल घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

मृत्यू दाखल्यांसाठी नागरीकांची भटकंती
भुसावळातील स्मशानभूमीत एखाद्या नागरीकाचा मृत्यू झाल्यानंतरही नोंद होत नसल्याची माहिती चौधरी यांनी देत त्यासाठी आधी नगरसेवकाचा दाखला मागितला जात असल्याचे सांगत या प्रकारातून काही गैरप्रकार घडल्यास त्यास जवाबदार कोण? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. प्रभागातील प्रत्येक नागरीकाच्या अंत्ययात्रेत नगरसेवक सहभागी होत नाही त्यामुळे दाखला दिल्यानंतर काही अप्रिय घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही चौधरी यांनी सांगत सत्ताधारी व पालिका प्रशासनाच्या कारभारावर सडकून टिका केली. गेल्या चार वर्षात जेव्हढ्या नागरीकांचा मृत्यू झाला आहे त्या सर्वांचे मृत्यू दाखले घेऊन न्यायालयात भुसावळ नगर परीषदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

तर नगराध्यक्षांवर अविश्‍वास का नाही?
भुसावळचा गेल्या चार वर्षांपासून विकास नाही, असे आता सत्ताधारी नगरसेवकच सांगत आहेत मग विकास न करणार्‍या नगराध्यक्ष रमण भोळे यांना नगरसेवक अपात्र का ठरवत नाही? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्यासाठी कायद्याची तरतूद असल्याचा दाखला देत सत्ताधारी नागरीकांची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून दिशाभूल करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.

यांची होती उपस्थिती
अमृत योजनेच्या खोदकामानंतर व्यवस्थीत खड्डे दाबले जात नाही, पावसाळ्यामुळे चिखल होवून नागरीकांना मनस्ताप हेात असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे म्हणाले. यावेळी नगरसेवक इकबाल शेख, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, नगरसेवक राहुल बोरसे, माजी नगरसेवक ललित मराठे, निखील भालेराव यांची उपस्थिती होती.

Copy