दुसर्‍याच्या बाथरूममध्ये पाहण्याची मोदींना खोड!

0

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांच्या बाथरुममध्ये डोकावण्याची खोड आहे, असे म्हणत काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत शनिवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, मोदींना गुगल वापरणे, भविष्य वाचणे आणि लोकांच्या बाथरुममध्ये डोकावणे या गोष्टी आवडतात. त्यांच्याकडे जेव्हा प्रश्नांची उत्तरे नसतात, तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारच्या नीतीचा वापर करतात. त्यांच्या सरकारचे गेल्या अडीच वर्षातील अपयश झाकण्यासाठी ते अशा प्रकारे लोकांचे लक्ष विचलित करतात. लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी देशात दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, असा टोलाही राहुल यांनी हाणला.

मन की नको, काम की बात करा

यावेळी अखिलेश यादव म्हणाले, शेवटी समाजवादी पक्षाने त्यांच्या म्हणण्याला प्रत्यक्ष आकार दिला आहे. पण काही लोक केवळ मन की बात करतात आणि काम की बात करत नाहीत, असा टोला त्यांनी नाव न घेता मोदी यांना लगावला. ते, युपीसाठी काय करणार, हे बोलतच नाहीत. ते म्हणतात निवडणुकीसाठी दोन कुटुंबांची आघाडी झाली आहे. पण आम्ही म्हणतो दोन युवक एकत्र आले आहेत ते म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष होय. आम्ही राज्याच्या विकासासाठी आखलेल्या या कार्यक्रमावर आमचे सरकार आल्यानंतर अंमलबजावणीस सुरवात करू, असेही अखिलेश म्हणाले.

शेतकर्‍यांना कर्जमाफी अन् महिलांना नोकर्‍या

काँग्रेस व समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशचा विकास करण्यासाठी एकत्र आले आहेत. पुढील पाच वर्षात उत्तर प्रदेशमध्ये बदल घडेल असे आश्वासनही यावेळी खा. गांधी यांनी दिले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस-सपा आघाडीचा किमान सामायिक कार्यक्रम जाहीर केला. त्याअंतर्गत दहा कलमी कार्यक्रम घोषित करण्यात आला. यात तरुणांना मोफत स्मार्ट फोन, वीस लाख तरुणांना रोजगार, शेतकर्‍यांची कर्जमाफी, वीजेच्या दरात कपात, गरिबांसाठी निवृत्तीवेतन सुविधा, चांगल्या पायाभूत सुविधा, गुणवत्ता यादीत येणार्‍या मुलींना सायकल, सरकारी नोकर्‍यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण, दलित व मागासवर्गीयांना मोफत घरे वाटप इत्यादींचा समावेश आहे.

10 मोठी आश्‍वासने; मुलींना मोफत सायकल

शनिवारी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचा संयुक्त जाहीरनामा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रसिध्द केला. सत्ता आल्यानंतर युवकांना मोफत स्मार्टफोन, वीस लाख युवकांना रोजगाराची हमी, शेतकर्‍यांनी कर्जमाफी आदि दहा मोठी आश्‍वासने त्यांनी दिली. एक कोटी गरीब कुटुंबांना दर महिना 1 हजार रूपये पेन्शन दिली जाईल, शहरी भागातील गरीबांना 10 रूपयात जेवण उपलब्ध करून दिले जाईल, सरकारी नोकर्‍यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण तर पन्नास टक्के आरक्षण ग्रामपंचायत आणि पंचायत समिती पातळीवरील स्थानिक समित्यांच्या निवडणुकीत देण्यात येणार, पुढील पाच वर्षात प्रत्येक ग्रामीण भागाला वीज, पाणी आणि रस्ते देणार, अशी आश्‍वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. काँग्रेस, समाजवादी पक्षाचे सरकार आल्यानंतर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 9 वी ते 12 वीच्या सर्व विद्यार्थिनींना मोफत सायकल, 10 लाख गरीब, मागासवर्गीयांना मोफत घरे, सहा मोठ्या शहरांशी गावांना जोडण्यासाठी चौपदरी रस्ते इत्यादी आश्‍वासने या आघाडीने दिली आहेत.