दुर्लक्षामुळे मोठे प्रकल्प बाहेर जात असतील तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही : अजित पवार

After running away Foxconn, now the work of showing carrots to the state is now on: Opposition Leader Ajit Pawar’s remarks चाळीसगाव : माजी मंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार हे गुरुवारी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे पवारांनी चांगलाच संताप व्यक्त करीत सरकारवरही ताशेरे ओढले. ते म्हणाले की, आता हा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र कुणाच्या दुर्लक्षामुळे मोठे प्रकल्प बाहेर जात असतील तर हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

कोणत्याही राज्याला विरोध मुळीच नाही
चाळीसगावात गुरुवारी सकाळी अजित पवार यांचे आगमन झाल्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न झाले होते. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. या प्रकल्पासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा सुरुवातीला विचार करण्यात आलेला होता. आमचा कोणत्याही राज्याला विरोध नाही, पण आमच्या राज्यातील प्रकल्प कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करण्याची गरज
आम्ही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावं, प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प राज्यातच रहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होत असताना त्यावेळी आमच्या सरकारने प्रकल्पाला विविध सवलती देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली होती. या प्रकल्पासाठी तळेगाव येथील जमीन देखील निश्चित करण्यात आलेली होती, असे अजित पवार म्हणाले.

असे प्रकल्प महाराष्ट्रात आलेच पाहिजेत
प्रकल्पासाठी त्या ठिकाणी सर्व गोष्टी पूरक होत्या. हा प्रकल्प गुजरातला नेल्यानंतर आता गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे. आमचं तर म्हणणं आहे की हा प्रकल्प पण महाराष्ट्रातच व्हावा आणि दुसरा प्रकल्पही महाराष्ट्रात येऊ द्यावा. ज्या प्रकल्पामुळे राज्याचे हित होत असेल पर्यावरणाचं संवर्धन राखलं जात असेल, असे प्रकल्प महाराष्ट्रात आलेच पाहिजेत, या मताचे आम्ही असल्याचेही अजित पवार म्हणाले.