Private Advt

दुर्दैवाचा फेरा : रेल्वे चुकली अन् मृत्यूने दोघा विद्यार्थ्यांना गाठले

चाळीसगावजवळील अपघातात जळगावच्या विद्यार्थिनीसह कन्नडचा विद्यार्थी ठार

चाळीसगाव : पोलिस भरतीचे स्वप्न पाहणार्‍या दोघा विद्यार्थ्यांचा चाळीसगावजवळील दुचाकी अपघातात मृत्यू झाला. विशेष म्हणजे जळगावहून पाचोरा येथे परीक्षेला जाण्यासाठी जळगावातील विद्यार्थिनी चुकीच्या मेमूमध्ये बसल्याने पाचोरा स्थानकावर ही गाडी न थांबता चाळीसगावात थांबली व तेथून पाचोरा शहराकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात घडून दोघांचा मृत्यू ओढवला. या अपघातात पायल कैलास पवार (19, रा.शिवाजीनगर, जळगाव) व तेजस सुरेश महेर (20, पांगरे, ता.कन्नड) अशी मयतांची नावे आहेत.

दुर्दैवाचा असाही फेरा
जळगावातील आयुष करीअर अकॅडमीत पोलिस भरती प्रशिक्षणासाठी पायल पवार हिने प्रवेश घेतला होता तर बारावीच्या परीक्षेसाठी तिने गाळण (ता.पाचोरा) हे केंद्र निवडले होते. गुरुवारी सकाळी पायल मराठीचा पेपर देण्यासाठी जळगावहून पाचोर्‍याला रेल्वेने येण्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर आली. भुसावळ-ईगतपुरी मेमू ट्रेनमध्ये बसण्याऐवजी ती भुसावळ-दौंड मेमूत बसली व या गाडीला पाचोरा थांबा नसल्याने ही गाडी चाळीसगावात थांबली. चाळीसगावला उतरल्यावर पायलने भांबावलेल्या स्थितीत सुरुवातीला काकांना तसेच नंतर आयुष अकॅडमीच्या शिक्षकांना फोनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिल्याने अकॅडमीच्या शिक्षकांनी तत्काळ कन्नड तालुक्यातील पांगरे येथील तेजस सुरेश महेर (20) या विद्यार्थ्याशी संपर्क साधला. तोदेखील अकॅडमीचा विद्यार्थी असल्याने तो गावी असल्याने चाळीसगाव येथून पायलला सोबत घेऊन गाळणला सोडून देण्याची विनंती शिक्षकांनी केली. त्यानुसार तेजस दुचाकीवर (क्र.एम.एच.14-जी.क्यू.4144) पायलला घेऊन चाळीसगाव येथून गाळण येथील परीक्षा केंद्रावर जात होता. वाटेत भडाळी-भामरे रस्त्यावर पिकअप व्हॅनने (क्र.एम.एच.19-सी.वाय.3431) दुचाकीला धडक दिली. या अपघातात तेजस महेर याचा जागीच मृत्यू झाला तर पायल पवार ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने काही वेळाने तिची प्राणज्योत मालवली. मयत पायलच्या पश्चात आई, वडिल, दोन बहिणी, भाऊ असा परीवार आहे. पायलचे वडिल जळगाव रेल्वे स्थानकावर कॅन्टीन चालवतात. दरम्यान, दोघा विद्यार्थ्यांचे पोलिसात भरती होण्याचे स्वप्न अपूर्ण ठरले तर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.