दुरदर्शन टॉवरसमोर ट्रकची दुचाकीला धडक

0

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 वरील दुरदर्शन टॉवर समोर आज सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास नशिराबाद येथून जळगावात कामासाठी येत असलेल्या मजुराच्या दुचाकीला भुसावळकडे भरधाव वेगात जाणार्‍या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या अपघात दुचाकीवरील दोघेही मजुर जखमी असून त्यातील एकाला डोक्याला गंभीर इजा झाली. गलुदास रमेश माची असे त्या गंभीर जखमी मजुराचे नाव आहे. गलुदास यांच्या डोक्याला जबर इजा झाली असल्याने त्यांना खाजगी रूग्णालयातून मुंबई येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते.

ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक
नशिराबाद येथील सतिष गौतम साळवे बांधकाम ठेकेदार असून त्यांच्याकडे गलुदास रमेश मोची (वय-24), सुभाष दशरथ कोळी (वय-35) दोन्ही रा. भवानी नगर नशिराबाद हे मजुर म्हणून कामाला आहेत. जळगावातील ज्ञानदेव नगर येथे बांधकाम साईड सुरू आहे. त्यामुळे सकाळी साईडवर जाण्यासाठी गलुदास मोची व सुभाष कोळी हे दोघे मजुर एमएच.19.सीके. 8791 या दुचाकीवरून सकाळी जळगावसाठी नशिराबाद येथून निघाले. सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रं. 6 वरील दुरदर्शन टॉवर समोरून जात असतांना जळगावकडून भुसावळकडे जाणार्‍या ट्रक क्रं. एमएच.19.जे.9576 वरील चालक काशिनाथ शंकर सोनवणे याने गलुदास यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
या धडकेत गलुदास मोची यांच्या डोक्याला जबर मार बसला तर सुभाष कोळी यांना किरकोळ मार बसला. त्यातच ठेकेदार सतिष गौतम साळवे, अनिल नथ्थु देवळे व इतर मजुर हे गलुदास यांच्या मागुन येते होते. त्यामुळे त्यांना मजुरांचा अपघात झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी इतर मजुरांच्या मदतीने गलुदास यांना रिक्षात बसवुन जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. प्राथमिक तपासणी नंतर गलुदास यांना डोक्याला जबर इजा झाल्यामुळे त्यांना इंडोअमेरिकन यांना रूग्णालयात उपचारार्थ हलविले. यावेळी जखमींच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती. यानंतर गलुदास मोची यांना मुंबई येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी ट्रकसह चालक काशिनाथ सोनवणे यांना ताब्यात घेतले आहे. तर सुभाष कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.