दुय्यम निबंधक कार्यालयात केली चौकशी

0

जळगाव। अभय भंगाळे याच्या प्लॉट फसवणूक प्रकरणाचे धागेदोरे दुय्यक निबंधक कार्यालयापर्यंत असल्याचा शहर पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आज गुरूवारी सकाळीच 10 वाजता या प्रकरणाचे तपासाधिकारी दिपक गंधाले यांनी दुय्य्य निबंधक कार्यालय गाठून सहाय्यक दुय्यम निबंधकांची भेट घेत आवश्यक कागदपत्रे मिळविली. तसेच मुळ दस्त पावती बाबत चौकशी केली. यातच या प्रकरणाचा तपास हा अंतिम टप्प्यात आला असून लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

गणेश कॉलनीतील अभय उमाकांत भंगाळे (वय 19) यांच्या मालकीच्या पिंप्राळा शिवारातील गट क्रमांक 152 मधील भूखंड, निमखेडी शिवारातील गट क्रमांक 122 मधील दोन भूखंड, मेहरूण परिसरातील रचना नगरातील तीन भूखंड बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केली होती. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी अभय भंगाळे यांनी दिलेल्या फियार्दीवरून मयूर शदर राणे (वय 25), जगदीश माधव सोनवणे (वय 26), हेमकांत निळकंठ भंगाळे (वय 29), निलेश विष्णू भंगाळे, विष्णू रामदास भंगाळे, प्रतिभा विष्णू भंगाळे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. निलेशसह विष्णू भंगाळे, प्रतिभा भंगाळे यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत.

कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचा संशय
प्रकरणातील कागदपत्रे निलेश भंगाळे याने तयार केली असून ती कशी तयार केली, तसेच खरेदी दस्तावरील स्वाक्षर्‍या व अंगठे तसेच शिक्के बनावट असल्याने संशयितांनी शिक्के कोठून व कसे मिळविली त्याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच प्लॉटची विक्री करताना संशयितांनी ई चलन काढले आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्वाक्षरी व शिक्के असलेली बनावट खरेदी पावती तयार केलेली आहे. यात दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.