दुचाकीस्वारांवर सीसीटीव्हीचा वॉच

0

हेल्मेट न घालणार्‍यांवर होणार कारवाई

पुणे : शहरात 1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नुकतेच जाहीर केले. वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ विचारात घेता हेल्मेट सक्ती झाल्यानंतर प्रत्येक चौक तसेच गल्लीबोळात कारवाई करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हेल्मेट न परिधान करणार्‍या दुचाकीस्वारांवर शहरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. शहरात रस्ते अपघातात मोठ्या संख्येने दुचाकीस्वार बळी पडत आहेत. या पार्श्भूमीवर शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कारवाई करणे शक्य

शहराचा वाढता विस्तार पाहता हेल्मेट सक्ती झाल्यानंतर शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नेमणे शक्य होणार नाही. पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे सध्या 1000 कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने पुणे आणि पिंपरी शहर परिसरातील प्रमुख चौक तसेच रस्त्यांवर 1,240 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. सध्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट सक्ती झाल्यानंतर हेल्मेट परिधान न करणार्‍या दुचाकीस्वारांविरोधात सीसीटीव्ही कॅमेर्‍यांद्वारे प्रभावी कारवाई करणे शक्य होईल, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकार्‍यांनी दिली. वाहतूक पोलिसांकडून गेल्या दहा महिन्यांत हेल्मेट परिधान न करणार्‍या 38 हजार दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 कोटी 90 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Copy