दुचाकीवरून पडल्याने मदतनीस महिलेचा मृत्यू

धावत्या दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने घडली दुर्घटना ः डोंगरकठोरा आरोग्य केंद्रात मयत विवाहिता होत्या नोकरीस

यावल : धावत्या दुचाकीच्या चाकात ओढणी अडकून झालेल्या अपघातात 38 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या पुढे झाला. या अपघातात कल्पना अनिल सोनवणे (38, रा.न्यू व्यास नगर, यावल) या विवाहितेचा मृत्यू झाला. मयत सोनवणे या डोंगरकठोरा येथील आरोग्य केंद्रात मदतनीस म्हणून सेवेस होत्या. त्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात आली.

डोक्याला जबर दुखापत झाल्याने मृत्यू
सोमवारी दुपारी कल्पना सोनवणे या पती अनिल लिलाधर सोनवणे यांच्या सोबत दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.एच.5865) ने डोंगरकठोरा येथील काम आटोपून घरी परत असताना सोमवारी साडेतीन वाजेच्या सुमारास चितोडा-यावल दरम्यान ढाके वकील यांच्या शेताजवळ असतांना चालत्या दुचाकीत त्यांची ओढणी अडकल्याने त्या दुचाकीवरून खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. रस्त्यावरून जाणार्‍या संदेश पाटील यांनी त्यांच्या खाजगी वाहनातून त्यांना उपचारार्थ यावल रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू ओढवला. अपघाताचे वृत्त कळताच शहरातील न्यु व्यास नगरातील नागरीकांनी व आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली. अपघात प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ.बी.बी.बारेला यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करीत मृतदेह कुटूंबीयांना सोपवला. मयत कल्पना सोनवणे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परीवार आहे.

Copy