दुचाकीची पोलीस वाहनाला धडक; दोघांचा मृत्यू

0

जळगाव – भुसावळ न्यायालयाच्या कामकाज संपल्यानंतर सात कैद्यांना जळगावातील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यासाठी आलेल्या पोलीस वाहनाची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जळगाव भुसावळ रस्त्यावरील दुरदर्शन टॉवरजवळी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास घडली असून यातील दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला असून सोबत असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

पोलीस वाहनातील तीन पोलीस कर्मचारी आणी सात कैद्यांपैकी दोन कैदी जखमी झाले. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. उमेश संजय वारूळे (वय- 22) रा. 24, शनिपेठ आणि जया प्रभाकर गायकवाड (वय-26) रा. हिवरखेडा ता. जामनेर अशी दोन्ही मयतांची नावे आहे.

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ न्यायालयात सात कैद्यांबाबतची सुनावणी असल्याने सात कैद्यांना जळगाव जिल्हा कारागृहातून भुसावळला पोलीस वाहन क्रमांक (एमएच 19 एम 0713) ने दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर पुन्हा त्याच पोलीस गाडीने जळगावकडे येत असतांना खेडीजवळील दुरदर्शन टॉवरजवळ समोरून येणारी क्रमांक (एमएच 19 सीसी 8833) दुचाकी ओव्हर टेक करत असल्याचे पाहून पोलीस वाहनावरील चालकाने वाहनवर ताबा घेत दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न करत असतांना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील उमेश संजय वारूळे (वय- 22) रा. 24, शनिपेठ हा जागीच ठार झाला तर दुचाकीवर मागे बसलेल्या जया प्रभाकर गायकवाड (वय-26) रा. हिवरखेडा ता. जामनेर ह्या गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा देखील मृत्यू झाला.