दीपोत्सवात वाटीभर फराळ द्या अन् वंचितांचे तोंड गोड करा

भुसावळातील अंतर्नाद प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष

भुसावळ : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानने वाड्या-वस्त्यात दीपोत्सवात फराळ, नवीन कपडे आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.दात्यांकडून वाटी-वाटी फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नवीन कपडे आणि शालेय साहित्य गोळा करायचे, गरजू वस्त्या शोधायच्या आणि त्याठिकाणी दिवाळी साजरी करायची, असा हा उपक्रम आहे.यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष आहे.
समाजाचे आपण काही देण लागतो या भावनेतून अंतर्नाद प्रतिष्ठानने सन 2016 मध्ये या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.

जुने कपडे देण्याचे आवाहन
पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी, दुसर्‍या वर्षी जोगलखोरी व रावेर तालुक्यातील जुनी मोहमांडली येथे, तिसर्‍या वर्षी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण, विटवा या वस्तीवर तर चवथ्या वर्षी वड्री धरणाजवळील आसराबारी, पाचव्या वर्षी जामुन झिरा या आदिवासी वस्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील डोंगरदे या आदिवासी पाड्यावर बुधवार, 3 नोव्हेंबर रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शहरवासीयांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता यंदा व्यापक स्वरूप देण्याचा मानस प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी व्यक्त केला आहे. ज्यांना शक्य नसेल पण देण्याचे सुख अनुभवायचे असेल त्यांनी जुने कपडे स्वच्छ धुवुन व इस्त्री करून द्यावे, फराळ द्यायचा असेल तर उपक्रम समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे, समन्वयक प्रदीप सोनवणे, सहसमन्वयक समाधान जाधव, अमित चौधरी यांनी केले आहे.

उपक्रमासाठी यांचे परीश्रम
उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, संजय भटकर, अमितकुमार पाटील, जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, राजेंद्र जावळे, सुनील वानखेडे, शैलेंद्र महाजन, रोहिदास सोनवणे, जीवन सपकाळे, हरीश भट, श्याम दुसाने, निवृत्ती पाटील, संदीप रायभोळे, देव सरकटे, भूषण झोपे, अमित चौधरी, प्रमोद पाटील, सचिन पाटील, राजू वारके, विक्रांत चौधरी, तेजेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, मंगेश भावे, संदीप सपकाळे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परीश्रम घेत आहेत.

जुने व नवे कपडे गोळा करणार
गतवर्षी या उपक्रमात फराळासह जुने व नवे कपडे गोळा करण्यात आले व जवळपास 400 व्यक्तींना वाटप करण्यात आले. यंदा उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे जुने पण चांगल्या स्थितीतील शालेय दप्तर, स्वेटर , ब्लॅकेट असतील ते देण्यासाठी प्रतिष्ठानच्या उपक्रम समितीकडे द्यावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे यांनी केले आहे.

Copy