दीपनगर येथे कामगारांनी केला व्यवस्थापनाचा निषेध

0

भुसावळ । दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांचे प्रश्‍न तसेच येथील बंद असलेले वीज केंद्र सुरु करण्याबाबत कंत्राटी कामगार समितीतर्फे निवेदन देवूनही कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे दिपनगर येथे मंगळवार ७ रोजीपासून कंत्राटी कामगारांतर्फे बेमुदत आंदोेलन सुरु करण्यात आले आहे. यात २०० मेगावॅट वीज केंद्राजवळ द्वारसभा घेण्यात येवून समितीच्या पदाधिकार्‍यांनी व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.

याप्रसंगी कंत्राटी कामगार कृती समितीचे अध्यक्ष अरुण दामोदर यांनी उपस्थित कामगारांना संबोधित केले व महावितरण प्रशासनाने समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांची लवकरात लवकर दखल न घेतल्यास हे आंदोलन यापुढे तीव्र स्वरुपात करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यामुळे कामगारांच्या हितासाठी व्यवस्थापनाने निर्णय झेतसेच सर्व कामगारांनीदेखील आंदोलन यशस्वी होण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

व्यवस्थापनाने लक्ष द्यावे
दरम्यान, दिपनगर येथील २०० मेगावॅट क्षमतेचा संच व्यवस्थापनाने काही एक कारण नसतांना बंद केला आहे. यामुळे या संचाद्वारे निर्माण होणार्‍या वीज निर्मितीला ब्रेक लागला असल्यामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच याठिकाणी कामावर असलेल्या बहुतांश कामगारांना काढण्यात आल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला असून उपजिविकेचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

यांचा होता सहभाग
समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे शस्त्र उगारले असून ८ रोजी देखील काळ्या फिती लावून कामकाज व दुपारी ४ वाजता द्वारसभा, १४ रोजी लाक्षणिक उपोषण, २३ रोजी मोर्चा तर २८ रोजी संप पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनात कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अरुण दामोदर, उपाध्यक्ष विक्रम चौधरी, कार्याध्यक्ष महेंद्र तायडे, सहसचिव चंद्रा अवस्थी, सुनिल ठाकूर, सचिन भावसार यांच्या नेतृत्वाखाली कामगार आंदोलनात सहभाग नोंदविला.