भुसावळ : निरमा युनिव्हर्सिटी आणि अमेरिकन सोसायटी ऑफ क्वॉलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथे 26 आणि 27 रोजी गुणवत्ता व्यवस्थापन परिषद घेण्यात आली. यामध्ये दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील गुणवत्ता वाढीसाठी असलेले व्यवस्थापन लक्षात घेता या केंद्रास गुणवत्ता व्यवस्थापना आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या परिषदेमध्ये विविध देशातून आलेल्या प्रतिनिधींनी गुणवत्तेबाबत आपआपले 35 प्रबंध सादर केले. यात प्रामुख्याने भारतीयांसोबतच अमेरिका, कॅनडा, जर्मनी इ. देशातील प्रतिनिधींनी यात प्रामुख्याने भाग घेतला. या परिषदेमध्ये महानिर्मिती, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या वतीने उपकार्यकारी अभियंता शोभा सुब्रहमण्यम यांनी शोध ्रबंध सादर करुन पुरस्कार प्राप्त केला. औष्णिक विद्युत केंद्राच्या एका संचाच्या वार्षिक देखभालीच्या कामासाठी सर्वसाधारणपणे 30 दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी कसा कमीत कमी करता येईल यादृष्टीने अभ्यास करण्यात आला. यासाठी मुख्य अभियंता, उपमुख्य अभियंतापासून ते तळाच्या तंत्रज्ञ तीन पदापर्यंतच्या कर्मचार्यांपासून प्रस्ताव मागविण्यात आले. निर्णय प्रक्रियेमध्य सर्वांचा सहभाग घेण्यात आला.
वीज निर्मितीसाठी सूक्ष्म नियोजन
नेतृत्व आणि धोरणात्मक नियोजन करण्यात आले. शून्य दोष प्रणाली विकसित करण्यात आली. संच क्रमांक 4 च्या ज्या वार्षिक देखभाल कामासाठी 2014 मध्ये अंदाजे 30 दिवस लागले तेच कार्य सुक्ष्म नियोजनामुळे यावर्षी 21 दिवसात करण्यात आले.
यामुळे 9 दिवस आधीच संच सुरु झाल्यामुळे वीज निर्मिती वाढली आणि विजेचा दर कमी करण्याकामी हे नियोजन अतिशय महत्वपूर्ण ठरले.
मुक्त आणि मोकळ्या वातावरणामुळे वाढला कामाचा वेग
अनुभवी अधिकारी, कर्मचार्यांची मते लक्षात घेण्यात आली. निर्मिती व्यवस्थापन आणि प्रक्रिया व्यवस्थापन यात दुवा साधण्यात आला. प्रत्येक विभागाच्या संपर्कात राहून सूक्ष्म नियोजन करण्यात आले. वार्षिक देखभाल कामाची प्रक्रिया जटील असून विभागाविभागात योग्य समन्वय साधून कोणते काम कोणत्या टप्प्यात आहे, कोणते काम झाले, कोणते सुरु होणार आहे, पुढील दिवसाच्या कामाची रुपरेषा त्या त्या विभागास कळविणे, कामाच्या बाबतीत नियोजन हे मोठा अधिकारी ते तळाचा कर्मचारी अशी चाकोरीबध्द न ठेवता तळाच्या कर्मचार्यापासून सुरु करुन वरिष्ठ अधिकारी असे करण्यात आली. यामुळे छोटे छोटे निर्णय खालच्या पातळीवरच घेवून कामाचा वेग वाढविण्यात आला. अशा मुक्त आणि मोकळ्या वातावरणामुळे कामाचा वेग वाढला.
यांचे लाभले मार्गदर्शन
सध्या वीज दर कमीत कमी ठेवण्याच्या बाबतीत महानिर्मितीचा कटाक्ष असतो. मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या कुशल नेतृत्वामुळे केंद्रात नेहमीच उत्साहवर्धक आणि सर्वांगिण प्रगतीला पोषक वातावरण असते. उपमुख्य अभियंता माधव कोठुळे, नितीन गर्गे, सर्व अधिक्षक अभियंता यांचे मोलाच्या मार्गदर्शनामुळे उपकार्यकारी अभियंता शोभा सुब्रहमण्यम यांनी हे यश संपादित केले आहे. उपकार्यकारी अभियंता शोभा सुब्रहमण्यम यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.