‘दीन’ ठरविण्याऐवजी प्रोत्साहन गरजेचे

0

डॉ. युवराज परदेशी

भारतीयांचे क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. या खेळाबाबत भारतीय अतिसंवेदनशील आहेत का? एक सामना अथवा स्पर्धा गमावला म्हणजे पुढेही आतापेक्षा सरस कामगिरी आपण करू शकणार नाही असे थोडीस आहे. परवापासून 1983 च्या विश्‍वचषकाचे उदाहरण मीडिया देत आहे. कारण, तेव्हा भारत विश्‍वविजेता होईल याचा आत्मविश्‍वास क्रिकेटप्रेमी वर्गातही नव्हता मात्र, कपिल देव यांच्या नेतृत्त्वातील संघाने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करून दाखविली. भारतीय महिला संघ आज मोठ्या हिंमतीने उभा राहिला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणाच्या गावगप्पा ठोकण्यापेक्षा पुढील टी-20 विश्‍वचषकात एकमेव भारतीय महिला संघच सर्वोत्तम कामगिरी करेल, अशी सदिच्छ देणे आवश्यक आहे.

आईसीसी महिला टी-20 विश्‍वचषकाच्या विजेतेपदाला गवसणी घालण्याची भारतीय महिला संघाची कामगिरी थोडक्यात हुकली अन् खर्‍या अर्थाने इतिहास रचण्याची संधी गेली. पुरुष संघाने आजवर अनेकदा क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. 1983 सारखे अनेक अनपेक्षित विजय संपादन केले आहेत. महिला संघाने मात्र, प्रथमतःच अंतिम सामान्यापर्यंत धडक मारण्याची कौतुकास्पद कामगिरी केली. अंतिम सामान्यामध्ये जेव्हा भारतीय संघ पोहोचला तेव्हापासून संघातील महिला खेळाडूंच्या एकूणच कामगिरीबाबत भारतीयांच्या मनात असलेल्या अपेक्षा उंचावल्या होत्या. अनेकांच्या मनात 1983 च्या पुनरावृत्तीची उत्कंठा निर्माण झाली होती. भारत आणि इंग्लंड संघामधला विश्‍वचषकाचा उपांत्य सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. त्यानंतर साखळीतल्या
सर्वोत्तम कामगिरीच्या निकषावर भारतीय संघाची निवड अंतिम सामन्यात झाली. भारताने ‘अ’ गटातल्या चारपैकी चारही सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, पण इंग्लंडला ‘ब’ गटातल्या चारपैकी तीनच सामन्यांत विजय मिळवता आला होता. यजमान ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेवर विजय मिळवत अंतिम सामना गाठला. ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यास भारतीय महिला संघ पहिल्यांदा विश्‍वचषकाला गवसणी घालू शकतो हे तेव्हाच निश्‍चित झाले होते. या सर्वांचा दबाव संघावर होता. त्या दृष्टीने रविवारी झालेला अंतिम सामना महत्त्वाचा होता. जागतिक महिला दिनाला यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात हा सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर एलिसा हिलीने हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण, हिलीने यावेळी विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर दीप्तीने स्वत:च्याच गोलंदाजीवर हिलीचा झेल सोडला आणि हाच या सामन्याच टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर हिलीच्या फलंदाजीचे तुफान मैदानात पाहायला मिळाले. हिलीने 39 चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 75 धावा केल्या आणि त्यामुळेच सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकला. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतासमोर 184 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी सलामीवीर शफाली वर्मा ही अंतिम सामन्यात अयशस्वी ठरली. सामन्याच्या तिसर्‍याच चेंडूवर ती 2 धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त तानिया भाटीयाच्या जागी मैदानावर आलेली जेमायमा रॉड्रीग्ज शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात 2 चौकार लगावलेली स्मृती मानधना 11 धावा करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर 4 धावांवर माघारी परतली. दीप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक 33 धावा केल्या. भारताचे तब्बल 6 फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. भारताला 85 धावांनी मानहीकारक पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलियाने भारतावर दमदार विजय मिळवत पाचव्यांदा विश्‍वचषकाला गवसणी घातली. भारतीय संघाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही याचे दुःख क्रिकेटप्रेमींना होणे स्वाभाविक आहेच पण क्रीडा क्षेत्र म्हटले म्हणजे जय-पराजय आला. तो खिलाडूपणे घेतला पाहिजे. दुर्दैवाने तसे झाले नाही. भारतीय संघाची कामगिरी लागलीच ‘दीन’ ठरविण्याचा संकुचितपणा काहींनी दाखवून दिला. सर्वसामान्य जनतेने समजूतदारपणा एकवेळ दाखविला नसेल परंतु, शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने व क्रिकेटप्रेमीने मात्र, हे भान राखत भारतीय महिला संघाला पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहित करण्याचे काम केले. भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी त्यांची कामगिरी चांगलीच झाली, असे आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, आपल्या भारताच्या महिला संघाला ट्वेन्टी-20 विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. पण भारतीय संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. महिला संघाने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. भारतीय संघाचे भवितव्य उज्वल आहे. भारतीय संघाला यापुढील यशासाठी शुभेच्छा. लाजिरवाणा पराभव पाहिलेल्या संघाला पुढील विजयासाठी तयार करणे, त्यांचा हुरूप वाढविणे, खेळातील कमतरता दूर करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक होते आणि ते काम शरद पवार यांनी तातडीने केले. भारतीयांचे क्रिकेटप्रेम जगजाहीर आहे. या खेळाबाबत भारतीय अतिसंवेदनशील आहेत का? एक सामना अथवा स्पर्धा गमावला म्हणजे पुढेही आतापेक्षा सरस कामगिरी आपण करू शकणार नाही असे थोडीच आहे. मीडिया परवापासून 1983 च्या विश्‍वचषकाचे उदाहरण वारंवार देत आहे. कारण, त्यावेळी भारत हा विश्‍वविजेता होईल याचा प्रबळ आत्मविश्‍वास बहुतेकांमध्ये नव्हता मात्र, कपिल देव यांच्या नेतृत्त्वातील संघाने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करून दाखविली. भारतीय महिला संघ आज मोठ्या हिंमतीने उभा राहिला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सबलीकरणाच्या गावगप्पा ठोकण्यापेक्षा पुढील टी-20 विश्‍वचषकात एकमेव भारतीय महिला संघच सर्वोत्तम कामगिरी करेल, अशी सदिच्छ देणे आवश्यक आहे. न जाणो, पुढील विश्‍वचषकावर भारताचे नाव कोरलेले असेल.

Copy