दि रावेर पीपल्सच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार : परीक्षा रद्द करण्याची मागणी

रावेर : दि रावेर पीपल्स को.ऑप. बँकेच्या लिपिक पदासाठी 21 मार्च रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेबाबत उमेदवार पंकज राजू सुवर्णे यांनी जिल्हाधिकारी व सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधकांकडे लेखी तक्रार करून सदर परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

परीक्षेत गैरव्यवहाराचा आरोप
तक्रारदार सुवर्णे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, ही परीक्षा संचालक मंडळाने पारदर्शक न घेता गैरव्यवहार करून घेतली आहे तसेच परीक्षा ऑनलाईन घेणे आवश्यक असतांना ऑफलाईन घेण्यात आली. याबद्दल परीक्षेच्या दिवशी काही उमेदवारांनी बँकेच्या अध्यक्ष व मॅनेजर यांच्याकडे लेखी अर्ज देऊन परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष करून संचालक मंडळाने ऑफलाईन परीक्षा घेतली यात बँकेच्या संचालक मंडळाने काही उमेदवार व संचालक मंडळाच्या नात्या-गोत्यातील उमेदवार यांचेशी संगनमत करून परीक्षा घेतली आहे. वर्षानुवर्षे संचालक मंडळ पात्र उमेदवारांना डावलून स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना नोकरी देत आले आहे आणि यावेळी सुद्धा संचालक मंडळाने तोच कित्ता गिरवला आहे म्हणून सदरची परीक्षा रद्द करून एम.के.सी.एल.मार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.