दिल्ली विधानसभेत ईव्हीएमफची पोलखोल

0

दिल्ली : आम आदमी पार्टीचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभेत ईव्हीएम हॅक करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. ईव्हीएम हॅक होऊ शकते, असा दावा यानंतर भारव्दाज यांनी केला. त्यांनी या प्रात्यक्षिकाद्वारे हे दाखविण्याचा प्रयत्न केला की, प्रत्यक्षात मतदान केलेल्या पक्षास मत न जाता दुसर्‍याच पक्षाच्या उमेदवारास ते मिळत आहे. दरम्यान, विधानसभेत अशा प्रकारे ईव्हीएमसंबंधीचे प्रात्यक्षिक प्रथमच झाल्याने यावर पडसाद उमटू लागले आहेत.

ईव्हीएमसारखेच मशीन
उत्तरप्रदेश निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या विक्रमी विजयावर देशभरातील काही राजकीय पक्षांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होत. यामध्ये आम आदमी पक्ष आघाडीवर होता. याचाच एक भाग म्हणून केजरीवाल सरकारने दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन मंगळवारी बोलावले होते. या विशेष अधिवेशनात ईव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी वापरण्यात आलेले मशिन हे ईव्हीएम सारखे होते, निवडणुक आयोगाच्या ताब्यातील हे ईव्हीएम नव्हते.

90 सेकंदात मदरबोर्ड हॅक
आपचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी यावेळी दावा केला की, ईव्हीएम हॅकींगसाठी सीक्रेट कोडचा वापर केला जातो. 90 सेकंदात या मशीनचा मदरबोर्ड हॅक करता येतो. त्यांनी सर्वांसमक्ष केलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिकात 19 मते टाकली त्यापैकी 10 मते आम आदमी पार्टीला पडणे अपेक्षित होते परंतू प्रत्यक्षात आम आदमी पार्टीला दोनच मते पडली तर भारतीय जनता पार्टीला 11 मते पडली. सौरभ भारद्वाज ईव्हीएम सारखीच एक मशीन घेऊन विधानसभेत आले होते. त्यांनी दावा केला की, माझ्यासारखा साधारण अभियंता देखील हे मशीन टेम्पर करू शकतो.

असे झाले प्रात्यक्षिक
भारद्वाज यांनी मशीन सुरू केले. त्यानंतर प्रक्रिया सुरू केली. त्यांनी पाच बटने दाबली. भाजप, आप, काँग्रेस, बीएसपी आणि सपाला प्रत्येकी एक-एक मत टाकले. हीच प्रक्रिया पुन्हा केली. या मतदान प्रकियेत आम आदमी पार्टीला दहा मते तर भाजपला दोन मते पडणे अपेक्षीत होते मात्र, प्रत्यक्षात मतमोजणी केली असता भाजपला 11 मते मिळाली तर आम आदमी पार्टीला दोनच मते मिळाली. त्यांनी यावेळी दावा केला की, सकाळी सहा वाजता पक्षाच्या प्रतिनिधींना मशीन दाखवले जाते तेव्हा ते व्यवस्थित असते. कारण त्यावेळी मशीनमध्ये सीक्रेट कोड टाकलेला नसतो. सकाळी 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत मशीन ठीक असते. त्यानंतर कोणत्याही वेळी गडबड सुरू केली जाते.

प्रत्येक पक्षासाठी वेगळा कोड
भारद्वाज यांच्या दाव्यानुसार कोणत्याही पक्षाला यातून विजयी करता येऊ शकते. प्रत्येक पक्षासाठी पाच किंवा सहा आकडी गुप्त क्रमांक असतो. हा सीक्रेट कोड मतदान करण्याच्या बहाण्यानेच टाकला जातो. भारद्वाज यांच्या मते सकाळी 10 वाजता सीक्रेट कोड टाकला गेल्यास त्यानंतरची मते त्या विशिष्ट पक्षाला मिळतील. कारण तो कोड त्या पक्षाचा असतो. प्रात्यक्षिकाद्वारे देखील भारद्वाज यांनी हे दाखवून दिले. त्यांनी सीक्रेट कोड टाकल्यानंतर आम आदमी पार्टीला बटन दाबून दहा मते दिली, 2 बसप, 3 भाजप. 2 काँग्रेस आणि सपाला 2 मते दिली. परंतू त्यानंतर भाजपला 11 मते पडली.