दिल्लीत सोशल ट्रेडिंगचा आणखी एक ऑनलाइन घोटाळा

0

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील नोएडा येथे 3700 कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर सोशल ट्रेडच्या नावाखाली फसवणूक करण्याचे आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस आले. नोएडा येथील सेक्टर 2 मधील वेबवर्क लिंक प्रा. लि. नावाच्या कंपनीने चार महिन्यांत तब्बल दोन लाख लोकांना 500 कोटी रुपयांना फसवल्याचे समोर आले आहेत. गाझियाबाद येथील रहिवासी अमित किशोर जैन यांनी फसवणूक झाल्याची तक्रार सेक्टर 20 येथील पोलीस स्थानकांत दिली आहे.

कंपनी 2 महिन्यांकरिता केली बंद
पोलीस अधीक्षक दिनेश यादव यांनी याविषयी माध्यमांना सांगितले, कंपनीचे संचालक अनुराग गर्ग व सुदेश गर्ग यांच्याविरोधात फसवणूक व आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. सोमवारी कंपनीच्या बाहेर लोकांची गर्दी उसळली होती. कंपनीच्या गेटला कुलूप होते. तर बँकिंग प्रणालीत बदल होत असल्याने कंपनी 2 महिन्यांसाठी बंद राहणार असल्याची सूचना लावली होती. तसेच सर्व भागधारकांचे लायसन्स सुरक्षित आहेत, असे म्हटले आहे.

अ‍ॅड्सबुक नावाची कंपनी
कंपनी सप्टेंबर 2016 पासून चालू होती. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ऑनलाइन व्यवसाय करून पैसे कमावण्याची लालूच दाखवून लोकांची फसवणूक केली. कंपनीने शाहरुख खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. कार्यालयाबाहेर अभिनेत्यांचे मोठे पोस्टर्स लागले आहेत. या कंपनीचे अ‍ॅड्सबुक नावाने आणखी एक पोर्टल आहे, असा तक्रारकर्त्यांचा आरोप आहे