दिल्लीतील शाळेत मध्यान्ह भोजनात मिळाली मृत उंदिरे

0

नवी दिल्ली । शाळांमधून उच्च दर्जाचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे मध्यान्ह भोजन देण्याचा दिल्ली सरकारचा दावा फोल ठरला आहे. एका शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या मध्यान्ह भोजनात मेलेले दोन उंदीर आढळून आले आहेत. हे मध्यान्ह भोजन केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना त्रास झाला.

या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर दिल्लीचे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घटनेचा आढावा घेऊन दोषी संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात येणार असून, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

सगळे विद्यार्थी सुखरूप

दिल्लीतील देवळी भागात असणार्‍या सर्वोदय विद्यालयात देण्यात येणार्‍या मध्यान्ह भोजनात मेलेले दोन उंदीर सापडले होते. हे मध्यान्ह भोजन घेतल्यामुळे गुरुवारी नऊ विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. या विद्यार्थ्यांवर मालवीयनगर येथील मदनमोहन मालवीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सिसोदिया यांनी यासंदर्भात ट्विटरवर सांगितले की, दिल्लीतील एका शासकीय शाळेत मध्यान्ह भोजनात मेलेेले उंदिरे सापडली आहेत. हे दूषित भोजन खाल्ल्यामुळे नऊ मुलांची प्रकृती बिघडली होती. या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी या मुलांशी आणि डॉक्टरांशी चर्चा केली. आता ही मुले सुखरूप आहेत.

कंत्राटदार काळ्या यादीत

मनीष सिसोदिया यांनी अन्य ट्विटमध्ये मध्यान्ह भोजन पुरवणार्‍या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्याबरोबर त्याचा काळ्या यादीत समावेश करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, भाजपचे खासदार रमेश बिधुडी यांनी मध्यान्ह भोजन पुरवणारी संस्था आम आदमी पार्टीच्या एका आमदाराशी संबंधित असल्याचा आरोप केला आहे. दिल्ली सरकारने या घटनेनंतर शासकीय अधिकार्‍यांच्या देखरखीखाली मध्यान्ह भोजन तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर शिक्षकांनी या सर्व प्रकरणांत शासनाला दोषी धरले आहे.