दिल्लीतील अशोक विहारमध्ये इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली : दिल्लीतील अशोक विहार भागातील फेज ३ मध्ये सावन पार्क कॉलोनीत असणारी एक २० वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीत राहणाऱ्या ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत.

या इमारतीची काही वर्षांपूर्वीच दुरावस्था झाली होती. आज सकाळी साडे नऊच्या सुमारास ही इमारत कोसळली. या घटनेची माहिती लगेच स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिली. पोलीस दल, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथकांनी घटनास्थळी पोहचून युद्ध पातळीवर काम सुरू केले. इमारतीत राहणाऱ्या चार लहान मुलांचा आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सात जखमींना ढिगाऱ्याखालून जीवंत बाहेर काढण्यात यश आले असून त्यांना जवळच्या दीप चंद बंधू रुग्णालयात अधिक उपाचारांसाठी दाखल करण्यात आले आहेत. इमारतीच्या ढीगाखाली अजून कोणी अडकले आहे का याचाही शोध सुरू आहे. इमारत कोसळण्याचे नेमके कारण मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही.

Copy