दिल्लीच्या शिवमचे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक

0

नवी दिल्ली: काही दिवसापूर्वीच दिल्लीच्या एका फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्रिशतक फटकावले होते. काही दिवस उलटत नाहीत तोच दिल्लीच्या अजून एका फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक फटकावण्याचा पराक्रम केला आहे. दिल्लीतील शिवम सिंग या फलंदाजाने केवळ 71 चेंडूत द्विशतकी खेळी करण्याची किमया साधली आहे. त्याने 71 चेंडूत 210 धावा फटकावल्या.

शिवम सिंग याने 19 फेब्रुवारी रोजी गेमस्टार रॉकेट्सकडून खेळताना युनायटेड एकादश संघाविरुद्ध हे द्विशतक ठोकले. या खेळीदरम्यान शिवमने 18 चौकार आणि 19 षटकार ठोकले. तर त्याचा स्ट्राइक रेट 295 एवढा राहिला. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ केवळ 109 धावांत गारद झाला. त्याआधी दोन आठवड्यांपूर्वी मोहित अहलावत या फलंदाजाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्रिशतकी खेळी केली होती. मात्र त्याने ज्या मैदानावर त्रिशतक फटकावले त्याची सीमारेषा लहान असल्याने त्या खेळीवरून वाद निर्माण झाला होता. दरम्यान, सध्या मोहित हा विजय हजारे करंडक स्पर्धेत दिल्लीच्या संघात राखीव खेळाडू आहे.