दिड लाखांच्या गांजासह तस्कर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव : चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजा तस्कर तरुणाच्या चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खुर्द गावातून मुसक्या बांधल्या आहेत. तरुणाच्या ताब्यातील तीन किलो वजनाच्या गांजासह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तेजस महादेव खरटमल (19, जुना पॉवर हाऊस, ता.चाळीसगाव, जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव-भडगाव रोडवरील बोरखेडा खुर्द गावातील बस स्थानकाजवळ दुचाकीवरून बेकायदेशीररीत्या गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास तेजस महादेव खरटमल (19, चाळीसगाव) याच्या मुसक्या आवळल्या. संशयीताकडील 43 हजार 500 रुपये किंमतीचा दोन किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा व एक लाख 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच. 19 डीएस 2176) असा एकूण एक लाख 53 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गत महिन्याभरात ही तिसरी कारवाई असल्याने अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावंडे व पोलि निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रमेश चव्हाण, सहाय्यक निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक लोकेश पवार, हवालदार दत्तात्रय महाजन, जयंत सपकाळे, गोवर्धन बोरसे, भूपेश वंजारी, हिराजी शिवाजी देशमुख, मनोहर पाटील आदींनी केली. जयंत सपकाळे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एनडीपीएस क्ट कलम- 8 (सी), 20 (बी), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक रमेश चव्हाण व नाईक भुपेश वंजारी हे करीत आहेत.