दारू पिण्यास पैसे न दिल्याने जन्मदात्या आईचा खून : आरोपी मुलास अटक

धुळे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यावरून मुलानेच जन्मदात्या आईला मारहाण करत तिचा खून केला. ही धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील कुडाशी पैकी आंबा पाडा येथे गुरुवारी घडली. या घटनेत सुमनबाई बंडू बागुल (60) या महिलेचा मृत्यू झाला तर पोलिसांनी आईचा खून केल्याप्रकरणी मुलगा गुलाब बंडु बागुल (रा.कुडाशी पैकी अंबापाडा ता.साक्री) यास अटक करण्यात आली.

दारूसाठी पैसे न दिल्याने आईचा खून
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयीत आरोपी गुलाब बंडु बागुल (रा.कुडाशी पैकी अंबापाडा ता.साक्री) याला दारू पिण्याचे व्यसन असून गुरुवारी रात्री आठ वाजेपूर्वी आई सुमनबाई बंडू बागुल (60) यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली मात्र सुमनबाई यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिल्याने संशयीताने आईस हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली तसेच तिचे डोके घरातील भिंतीवर व फरशीवर आपटल्याने सुमनबाई यांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा वाद सुरू असताना गावातील चुनीलाल तानाजी बागुल (वय 55) हे त्याला समजविण्यास गेले असता संशयीताने त्यांना देखील हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणी चुनीलाल बागुल यांनी पिंपळनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आहे. तपास पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक एस.एस.साळुंखे करीत आहेत.

Copy