दारूसाठी रांगा लावणार्‍यांचे रेशन कार्ड रद्द करण्याची मागणी

0

औरंगाबाद – दारू खरेदी करण्याएवढा पैसा ज्यांच्याकडे आहे ते अन्नधान्यही नक्कीच खरेदी करू शकतात. त्यामुळे वाइन शॉप सुरू होताच दारूच्या दुकानांसमोर रांगा लावणार्‍या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

लॉकडाऊन तिसर्‍या टप्प्यात राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. शिवाय, पोलीस यंत्रणेवरचा ताण ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमने सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. सरकारचा हा निर्णय लज्जास्पद आहे, असे जलील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या चांगल्या कामाचे आम्ही देखील कौतुक करत होतो. पण आता ते सगळे व्यर्थ गेले आहे. औरंगाबादमध्ये एकही दुकान आम्ही उघडू दिले नाही. मग रेड झोनमधील इतर आमदार, खासदार या मृत्यूच्या खेळाला का आमंत्रण देत आहेत. कदाचित ते देखील ‘बेवडे’ असावेत, असा संताप जलील यांनी व्यक्त केला आहे.