दारुगोळा फॅक्टरीमध्ये गॅस गळती

0

खडकी : खडकी येथील होळकर पुलाजवळ असलेल्या हाय एक्सप्लोझिव्ह (एचई) फॅक्टरीमध्ये शनिवारी सकाळी सव्वादहा वाजता नायट्रिक अ‍ॅसिडच्या पाईपलाईनमधून गॅस गळती झाली होती. दरम्यान फॅक्टरी प्रशासनाच्या अग्निशामक दलाने त्यावर तत्काळ उपाययोजना केली आहे. कोणत्याही प्रकारची हानी किंवा नुकसान झालेले नाही, असे फॅक्टरी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्ड हद्दीमध्ये लष्कराची हाय एक्सप्लोझिव्ह (एचई) हा कारखाना होळकर पुलाजवळ आहे. या कारखान्यात शनिवारी सकाळी नायट्रीक अ‍ॅसिडच्या पाईपलाइनमधून सकाळी सव्वा दहा वाजता गळती झाली होती. फॅक्टरी प्रशासनाने कामगारांना तत्काळ बाहेर काढले. त्यानंतर अग्निशामक दलाने काही मिनीटातच या गॅसगळतीवर नियंत्रण मिळविले, अशी माहिती फॅक्टरीचे सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट कर्नल राजेंद्र सिंग यांनी पोलिसांना कळविल्याचे खडकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी दिली.