दाम्पत्यांचा एकमेकांवरील विश्‍वास उडाला; ‘पॅटर्निटी’ चे प्रमाण वाढले!

0
 पुणे/पिंपरी-चिंचवड : दाम्पत्यांचा एकमेकांवरील विश्‍वास उडत चालल्याची धक्कादायक बाब निदर्शनात आली आहे. जन्मला आलेले अपत्य आपलेच आहे किंवा नाही, हे तपासून पाहण्याची मानसिकता पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पुरुषांमध्ये अचानक वाढली असून, कुटुंब व्यवस्था अडचणीत सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुण्यातील औंध येथील विभागीय फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत (पीआरएफएसएल) पॅटर्निटी टेस्टचे (रक्त नमुन्याद्वारे अपत्य आपलेच आहे किंवा नाही हे जाणून घेणे.) प्रमाण कमालीचे वाढले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये अशाप्रकारे केवळ 37 पुरुषांनी रक्तचाचणी करून घेतली होती. परंतु, 2016मध्ये हे प्रमाण तब्बल 321 झाले आहे. 2017 मध्ये हे प्रमाण आणखीच वाढणार आहे, असेही सूत्राने स्पष्ट केले. पूर्वी ही सुविधा केवळ मुंबईत होती. ती आता पुण्यातदेखील उपलब्ध झाली आहे. एकमेकांवरील अविश्‍वासापोटी अनेक जोडप्यांनी ही चाचणी करून घेतली आहे. तर काहींनी आपल्या पत्नीच्या नकळत ही चाचणी केली असल्याचेही सूत्राने सांगितले.
मुंबईऐवजी आता पुण्यातच झाली सोय…
सुरुवातीला फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत केवळ फिगरप्रिंट, सायबर फॉरेन्सिक, टेप ऑथेंटिकेशन, स्पीकर ऑथेंटिकेशन आणि फॉरेन्सिक क्लिनिकल टॉक्सिकॉलॉजी याच प्रकारच्या चाचण्या होत होत्या. डीएनए चाचणीसाठी मुंबईला महाराष्ट्र फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेत जावे लागत होते. परंतु, ही सुविधा आता पुण्यातील औंध येथील प्रयोगशाळेतदेखील उपलब्ध झालेली आहे. 2014 मध्ये सुरु झालेल्या या सुविधेबाबत फारशी जागृकता नव्हती. परंतु, जसजशी माहिती जाहीर होऊ लागली तसतसे या प्रयोगशाळेत अनेकांची धाव वाढली. गत तीन वर्षात पटरनिटी चाचणी करून घेणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक पाहाता, ही चाचणी खून, किंवा मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी केली जाते. याबाबतचे पुरावे न्यायालय ग्राह्य धरत असते. कधी कधी न्यायालयच पोलिसांना अशाप्रकारे डीएनए चाचणीचे आदेश देत असते. परंतु, एखादा व्यक्ती स्वतःचा संशय दूर करण्यासाठीही आपल्या अपत्याची अशाप्रकारे रक्तचाचणी करून घेत असल्याचेही सूत्र म्हणाले.
2017 मध्ये आकडेवारी आणखी वाढणार!
गत तीन वर्षातील अशाप्रकारची आकडेवारीच या प्रयोगशाळेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दैनिक जनशक्तिला उपलब्ध करून दिली. 2014 मध्ये 27 जणांनी पॅटर्निटी टेस्ट करून घेतली होती. 2015 मध्ये ही संख्या 197 झाली तर 2016 मध्ये हा आकडा 300 च्या पुढे गेला आहे. 2017 मध्ये हा आकडा 500च्याही पुढे जाईल, अशी शक्यताही या अधिकार्‍याने व्यक्त केली. जे दाम्पत्य अशाप्रकारे रक्तचाचणी करून घेत आहेत, त्यांचे कौटुंबीक वातावरण अत्यंत खुले असे असून, ही मंडळी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. पटरनिटी टेस्टसाठी चांगलाच खर्च येतो. तरीही अशाप्रकारचे शुल्क दाम्पत्य भरत आहेत.
लैंगिक स्वातंत्र्य कुटुंब व्यवस्थेच्या मुळावर!
या चाचणीत प्रामुख्याने आईचा डीएनए तर अपत्याशी जुळतोच; परंतु वडिलांचादेखील जुळायला पाहिजे. बहुतांश प्रकरणात वडिलांचा व अपत्याचा डीएनए वेगवेगळा आलेला आहे. त्यामुळे संबंधित पुुरुष त्या अपत्याचा बायोलॉजिकल वडिल नाही हे आपोआप सिद्ध होते. कौटुंबीक संपत्तीच्या वाटणीप्रकरणातही अशाप्रकारे डीएनए चाचणी केली जात असल्याचेही उघडकीस आले आहे. पुण्यात स्वच्छंदी मानसिकता वाढीस लागली असून, स्त्री-पुरुष दोघेही लैंगिक स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत. परंतु, या आनंदापोटी कौटुंबीक विश्‍वासर्हता मात्र नष्ट होत आहे. त्यात पटरनिटी टेस्टच्या पुराव्यामुळे हे कौटुंबीक नातेच संपुष्टात येत असल्याचेही धक्कादायक वास्तव चव्हाट्यावर आलेले आहे.