दापोरा शिवारात रेल्वे रुळावर अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

अपघात की आत्महत्या अद्याप कारण अस्पष्ट

जळगाव : जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ बुधवार, 1 डिसेंबर रोजी अंदाजे एका 30 ते 35 वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. ही आत्महत्या की अपघात हे नेमके अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळावर बुट मिळून आला असून त्यावरुन ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.

तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव ते शिरसोली दरम्यान दापोरा शिवारातील रेल्वे रुळावर खांबा क्रमांक 406/25 ते 406/27 दरम्यान मृतदेह पडलेला असल्याची माहिती रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक सौरभ कुमार यांनी तालुका पोलिस स्टेशनला कळविली. त्यानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे, अनिल मोरे, सतीष हाळनोर, दापोरा पोलिस पाटील जितेश गवंदे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान, मृतदेहाच्या जवळ काळ्या रंगाचा बूट सापडला आहे तर मयताचे कपडेदेखील खराब झाले आहेत. ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे. प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.