दानवेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा

0

नाशिक । शेतकर्‍यांबाबत बेताल वक्तव्य करणार्‍या रावसाहेब दानवेंवर बोलत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. शेतकर्‍यांबाबत केलेले वक्तव्य म्हणजे ही भाजप पक्षाची भूमिका आहे का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. तूर उत्पादक शेतकर्‍यांची भावना तीव्र असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष वादग्रस्त बोलतातच कसे? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी भाजपला विचारला. नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित एका पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजप व सेना सरकारवर सडकून टीका केली. आघाडी सरकारच्या काळात आम्ही विरोधकांचे म्हणणे ऐकत होतो, चर्चा करत होतो.

सभागृहात विरोधकांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप
युती सरकार आता विरोधकांनी काही मुद्दे मांडले की, ते खोडून काढतात. उलट विरोधकांच्या उणिवांवर बोट ठेवतात. मुख्यमंत्री सभागृहात त्वेषाने बोलून विरोधकांची मुस्कटदाबी करत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.चार दिवसापूर्वी जालन्यात रावसाहेब दानवे यांनी शेतकर्‍यांविषयी अपशब्द वापरला होता. त्यानंतर त्यांच्या राजकीय वर्तुळातून सडकून टीका झाली. शेतकरी वर्गातून त्यांचा निषेधही केला गेला. परंतु मुख्यमंत्री मात्र अजून काही बोलत नाहीत. तूर उत्पादक शेतकर्‍यांच्या भावना तीव्र असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष वादग्रस्त बोलतातच कसे? भाजप शेतकर्‍यांविषयी कोणती मानसिकता ठेवत आहे, याचा प्रत्यय आल्याचा दाफखला चव्हाण यांनी दिला.सत्तेत असूनही शिवसेनेला अस्तित्वाची लढाई करावी लागत असल्याचे, सांगत चव्हाण यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना चिमटा काढला. नगरपालिका, मनपा आणि जिल्हापरिषदांमध्ये शिवसेनेला जे संमिश्र यश मिळाले आहे. त्यावरून या पक्षात राजकीय अस्तित्वाच्या असुरक्षितेचा मुद्दा निर्माण झाल्याचे दिसत आहे. उलट काँग्रेस पक्षाने संघर्ष यात्रा काढून सर्व पक्षांसोबत घेऊन सक्षम विरोधकाचे स्वरुप शासनाला दाखवून दिले असल्याचे चव्हाण म्हणाले. विरोधक जेव्हा सभागृहात बोलतात, त्यावेळी भाजप नेमके त्यातील काही आमदारांच्या चुका त्यांच्या लक्षात आणून देत आणि भीती दाखवत त्यांना आपल्या बाजूला करत त्यांचा आवाज बंद करतात.