दाऊदच्या मदतीने भारताविरोधात जिहादची हाफिजची दर्पोक्ती

0

कोल्हापूर । हाफिज सईदला अमेरिकेच्या सांगण्यावरूनच पाकिस्तानात नजरकैदेत ठेवण्यात आले पण सईद अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने भारताविरोधात जिहाद पुकारणार असल्याची कबुली देणारे वक्तव्य सईदच्या मुलानेच केल्याची माहिती ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. कोल्हापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. निकम म्हणाले की, हाफिज सईदला अमेरिकेच्या सांगण्यावरुन नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ सईदच्या मुलाने पाकिस्तानमध्ये मोर्चा काढला होता.

यावेळी त्यांने भविष्यात हाफिज सईद दाऊदच्या मदतीने भारताविरोधात जिहाद पुकारणार होता अशी जाहीर कबुली दिली होती. त्याचे हे वक्तव्य भारतासाठी घातक आहे अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिम असल्याचे स्पष्ट होते, असे सांगून निकम पुढे म्हणाले की, हाफिज सईदची जमात-उद-दावा ही संघटना धार्मिक नाही वास्तविक ही संघटना लष्कर-ए-तोयबाचेच दुसरे रुप आहे.