दहिगावात आरोग्य विभागाकडून ‘होम टू होम सर्वे’

0

यावल : तालुक्यातील दहिगाव येथे कांदे भरण्यासाठी आंध्र प्रदेशातून आलेल्या एका ट्रकच्या क्लीनरचा कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दहिगावात या क्लीनरच्या संपर्कात आलेल्या व कांद्याची ट्रक भरणार्‍या 17 मजुरांसह तोलकाट्यावरील दोघांना शनिवारी रात्रीच जळगावात ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. संपूर्ण दहिगावात सॅनिटायजेशन केले जात असून घरोघरी जावून सर्वेदेखील केला जात आहे तर ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, यावल तालुका ग्रामीण रुग्णालयासह तालुका आरोग्य प्रशासनाकडे पीपीई कीट नसल्याने अशाही अवस्थेत कर्मचारी काम करीत असल्याची बाब समोर आल्याने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पॉझिटीव्ह अहवालाने उडाली खळबळ
आंध्र प्रदेशातून दहिगाव, ता.यावल येथे कांदा भरण्यासाठी नुकताच ट्रक आला होता तर या ट्रकवरील क्लीनरला कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला मात्र हा अहवाल येण्यापूर्वीच हा क्लीनर पसार झाल्याची बाब उघड झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ए.पी.एक्स 9969 या क्रमांकाचा ट्रक दहिगावात शुक्रवारी कांदे भरण्यासाठी आला होता तर ट्रक क्लीनर कोरोनाबाधीतच्या अहवालानंतर गावातील 17 मजूर व तोलकाट्यावरील दोघांना प्रशासनाने ‘क्वारंटाईन’ केले आहे.

Copy