Private Advt

दहिगावातील प्रौढाला तब्बल तेराव्यांदा झाला सर्पदंश

यावल : शेती कामे करताना सर्पदंश होण्याची बाब नवीन नाही मात्र यावल तालुक्यातील प्रौढाला एक-दोनदा नव्हे तर आताची वेळ धरून तब्बल 13 वेळा सर्पदंश झाल्याने गणेश देविदास मिस्तरी (सुतार) हे पुन्हा चर्चेत आले आहेत.

तेराव्यांदा झाला सर्पदंश
गणेश मिस्तरी हे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करत असता लघुशंकेसाठी तेथील सार्वजनिक शौचालयात गेल्यावर त्यास सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात येताच मिस्तरी यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला व सहकार्‍यांनी उपचार केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. याच मिस्तरी यांना यापूर्वी एप्रिल ते ऑक्टोबर 2017 सात महिन्यांच्या काळात तब्बल 10 वेळा सर्पदंश झाला होता. तेव्हा देखील हा चर्चेचा विषय ठरला होता.

असा झाला सर्पदंश
7 डिसेंबर 2016 केळीच्या बागेत, 17 एप्रिल 2017 घराजवळील लाकूड उचलताना, 12 मे 2017 रोजी घराबाहेर सफाई करताना, 25 मे 2017 रोजी शौचास जाताना, 14 जून 2017 रोजी घराबाहेरील माठातून पाणी घेताना, 26 ऑगस्ट 2017 रोजी घराबाहेरील लाकूड उचलताना, 14 सप्टेंबर 2017 रोजी केळी बागेत शौचास जाताना, 19 सप्टेंबर 2017 रोजी घराबाहेर, 28 सप्टेंबर 2017 रोजी घरातील बाथरूमजवळ, 12 ऑक्टोबर 2017 रोजी घराबाहेर काम करताना, 27 ऑक्टोबर 2017 रोजी घराबाहेर साफसफाई करताना, 22 डिसेंबर 2021 रोजी गावातील पटेल वाड्यात काम करताना आणि 25 मे 2022 रोजी गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करताना सर्पाने दंश केला.