Private Advt

दहा हजारांची लाच भोवली : जायखेडा पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ : छळ प्रकरणातील तक्रारदाराच्या आईसह बहिणीचे नाव कमी करण्यासाठी 40 हजार 600 रुपयांची लाच मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून दहा हजारांची लाच स्वीकारणार्‍या सटाणा तालुक्यातील नामपूर दूरक्षेत्रातील जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराला नंदुरबार एसीबीच्या पथकाने शनिवारी दुपारी साडेतीन वाजता लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. जगन्नाथ लाला महाजन (57) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दहा हजारांची लाच भोवली
32 वर्षीय तक्रारदार यांच्या आई-वडील व दोन्ही बहिण अशा पाच जणांविरुद्ध भादंवि कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यात तक्रारदार यांची आई व दोन्ही बहिणी यांची नावे गुन्ह्यातून कमी करण्यासाठी नाशिक ग्रामीणमधील जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार जगन्नाथ लाला महाजन (57) यांनी शनिवारी 40 हजार 600 रुपयांची लाच मागितली होती व पहिला हप्ता म्हणून दहा हजार मागितल्याने तक्रारदाराने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरोपी महाजन यांनी नामपूर दूरक्षेत्रात (पोलिस चौकी) लाच स्वीकारताच सापळा रचून असलेल्या पथकाने त्यांना अटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक (रीडर) सतीश भामरे, नंदुरबार पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार उत्तम महाजन, हवालदार विजय ठाकरे, नाईक देवराम गावीत, नाईक मनोज अहिरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.