दहा वर्षापासून पॅरोल रजेवर आलेला फरार कैदी पोलिसांच्या ताब्यात

0

चाळीसगाव । खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला व 10 वर्षापासून पॅरोलवर (संचित रजा) आल्यानंतर 2007 पासून फरार असलेला तालुक्यातील पिंपरखेड येथील कैदी चाळीसगाव पोलीसांच्या ताब्यात सापडला असून अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने 26 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजता तालुक्यातील उंबरखेड येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा बनावट नावाने 10 वर्षापासून तेथे वास्तव्यास होता.

संचित रजा संपल्यानंतर देखील चारही झाले फरार
तालुक्यातील पिंपरखेड येथे 22 मे 1993 रोजी शेतीच्या कारणावरून आतेभाऊ व मामेभाऊ यांच्यात वाद होवून भांडणात रूपांतर झाले. आरोपी शेख मुखतार शेख गपुैर, शेख निसार शेख गफूर, शेख अखतर शेख गफूर, शेख अन्सार शेख गफूर यांचेसह 11 जण (रा. पिंपरखेड व तांबोळे ता. चाळीसगाव) यांनी पिंपरखेड येथील शेख रऊफ नजमोद्दीन याला लाठ्या-काठ्या व कुर्‍हाड, लोखंडी गजांनी मारून त्यास जखमी केले होते. जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाल्याने 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान शिक्षा भोगत असतांना आरोपी शेख निसार शेख गफूर, शेख अख्तर शेख गफूर, शेख अन्सार शेख गफूर व शेख मुखतार शेख गफूर हे चौघे भाऊ 15 डिसेंबर 2007 रोजी पॅरोल घेऊन घरी आले होते. संचित रजा संपल्यानंतर देखील 4 ही कैदी कारागृहात परत हजर न झाल्याने 03 नोंव्हेंबर 2013 रोजी त्यांचेवर चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या खाक्या दाखवता दिली गुन्ह्याची कबुली
चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालया मार्फत एक पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिंपरखेड येथील खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोल वर सुटून फरार असलेला आरोपी शेख निसार शेख गफूर हा शारजील या बनावट नावाने तालुक्यातील उंबरखेड येथे राहत असल्याची गुप्त माहीती कॉन्स्टेबल बापुराव पाटील यांना मिळाल्यावरून त्यांनी सदर माहीती पोऊनि विजयकुमार बोत्रे यांना दिली. त्यांनी खात्री केल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, शहर पोलीस निरीक्षक आदीनाथ बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विजयकुमार बोत्रे, हवालदार दिलीप जाधव, डिबीचे कॉन्स्टेबल, बापुराव पाटील, वाहन चालक संदीप पाटील यांनी 26 जानेवारी 2017 रोजी रात्री 10:30 वाजता तालुक्यातील उंबरखेड येथून ताब्यात घेतले आहे. आरोपी शेख निसार शेख गपुैर यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने उडवा-उडवीची उत्तरे देऊन त्याचे नाव शारजील असे सांगितले. पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने त्याचे खरे नाव सांगितले.