दहा तासांत चोरट्यांना अटक

0

जळगाव । साडेसहा लाख रुपये किंमतीचे मोबाईल पार्सल कालीपिली या वाहनातून चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चोरट्यांचा तपास लावून घटना घडलेल्याच्या दहा तासांच्या आतच दोघां चोरट्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, दोघांकडून चोरलेले 48 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. यातच कालीपीलीचा चालक बनून साडे सहा लाख रुपये किमतीचे मोबाईलचे पार्सल व त्याचे भाडे स्विकारणारा आतिष करणसिंग पाटील हाच चोरटा निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच आतिषसह त्याचा साथीदार प्रल्हाद शांताराम चौधरी यालाही अटक केली आहे.

दोघांना घेतले ताब्यात
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बागुल व पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील रामकृष्ण पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, नितीन बाविस्कर, विजय पाटील आदी कर्मचार्‍यांनी पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात केली. कालीपिली वाहनचालक आतिष करणसिंग पाटील (वय-34 रा. एस.टी. कॉलनी) व त्याचा साथीदार प्रल्हाद शांताराम चौधरी (वय-34 रा. नशिराबाद) यांच्यावर पोलिसांना संशय आल्यावर त्याला तात्काळ ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी उडवा-उडवीची उत्तर देत एक-दुसर्‍याकडे मोबाईल असल्याचे सांगत होते. परंतू पोलिसांनी खाकीचा धसका दाखवताच दोघांनी पार्सल चोरी केल्याची कबूली दिली.

चोरट्यांकडून मोबाईल केले हस्तगत
चोरीची कबूली दिल्यानंतर संशयित आतिष पाटील याने पोलिसांना 48 मोबाईल तर प्रल्हाद चौधरी याने 2 मोबाईल घरातून काढून दिले. यातच एमआयडीसी पोलिसांना दहा तासाच्या आत चोरट्यांना अटक करून चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात यश आले आहे. तर दोघांना रविवारी न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वाहनातून पार्सल गायब
सिंधी कॉलनी येथील रहिवासी अरविंद कन्हैयालाल हसवाणी यांचे फुले मार्केटला शहर पोलीस स्टेशनच्या समोर दिशरिमा कम्युनिकेशन नावाचे मोबाईल विक्रीचे होलसेल दुकान आहे. भुसावळ येथील ऑर्डर आल्याने हसवाणी यांनी शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता दुकानातील कामगार जाहीद खान याच्याजवळ 5 प्रकारचे 6 लाख 37 हजार 600 रुपये किमतीचे 48 मोबाईल असलेले पार्सल भुसावळ येथे पाठविण्यासाठी दिले. खान हा हे पार्सल घेऊन अजिंठा चौकात गेला असता तेथे एका कालीपीलीजवळ (क्र.एम.एच.19 बी.जे.1041) थांबलेल्या आतिष पाटील याच्याजवळ दिले होते. त्यानंतर वाहनात पर्सल ठेवल्यानंतर ते काही वेळातच चोरीला गेले. हा प्रकार लक्षात येताच हसवाणी यांनी एमआयडीसी गाठून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला.