दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई – महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस, तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. त्यामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षांवर बरीच चर्चा झाली. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या, तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दाही पुढे आला. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडिओद्वारे हा निर्णय घोषित केला.