Private Advt

दहावीच्या निकालात राज्यातील 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : एसएससी परीक्षेत यंदादेखील कोकण विभागाने बाजी मारली आहे तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्याचा निकाल एकूण 96.94 टक्के इतका लागला असून शुक्रवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.

विभागानुसार लागलेला निकाल असा
पुणे- 96.96%
नागपूर- 97%
औरंगाबाद- 96.33%
मुंबई- 96.94%
कोल्हापूर- 98.50%
अमरावती- 96.81 %
नाशिक- 95.90%
लातूर- 97.27%
कोकण- 99.27%

96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,84,790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,68,977 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 54,159 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 52.351 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 41,390 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 79.06 आहे. यंदा राज्यात 9 विभागीय मंडळांमार्फत 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा झाली. 16,39,172 विद्यार्थी या परीक्षेसाठी राज्यभरातून बसले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील, निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल.