दरोड्यातील आरोपीचा भुसावळात आत्महत्येचा प्रयत्न

0

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ; पोलिसांना धमकी देत लॉकअपमध्ये हातावर ओढले ओरखडे

भुसावळ- भुसावळातील सराफा बाजारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या मुंबईतील चौघा दरोडेखोरांच्या मुसक्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या होत्या. यातील एका संशयीताने पोलिस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून आरोपीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मोइनोद्दीन शेख निजामुद्दिन (40, रा. काझीपाडा, साकी नाका, मुंबई) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या संशयीताचे नाव असून बुधवार, 3 ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांना अडकावण्याची धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न
दरोड्यातील चौघा आरोपींना शनिवारपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांना भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते तर बुधवाारी आरोपी मोइनोद्दीनने भिंतीचे पोपडे काढून स्वत:च्या हातावर मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपीला गांजा, चरस पिण्याची सवय असल्याने त्याने पोलिसांना त्याची मागणी केली असता नकार मिळाल्याने त्याने मी पोलिसांना अटकवून टाकेल, असे म्हणत त्याने लॉकअपच्या भिंतीचे पोपडे काढून हातावर ओरखडे ओढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी विनोद सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात मोईनोद्दिन यांच्या विरूध्द आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार अशोक जवरे पुढील तपास करीत आहेत.