दरोड्याच्या प्रयत्नातील टोळीला अटक

0

चिखली : बिअरबारवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना चिखली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास त्रिवेणीनगर येथे आरोपींना घातक शस्त्रांसह अटक करण्यात आली. शुभम नितीन काळभोर (वय 19), अमर राम पोटभरे (वय 20), शंकर सैनाजी आवळे (वय 19), राजेश बळीराम साळवे (वय 20, सर्व रा.चिखली) आणि सिद्धेश्‍वर गुणवंत झोंबाडे (वय 20, रा. देहूफाटा, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेणीनगर येथील राम मंदिरामागे काही संशयित तरुण थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राम मंदिर परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे लोखंडी कोयता, लोखंडी कटावणी, कटर, सहा मंकी मास्क असे साहित्य आढळून आले. यावरून त्यांना अटक केली. आरोपींकडे कसून चौकशी केली असता आरोपींनी यमुनानगर येथील स्वराज बिअर बारवर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Copy